राज्यातील तिघांना साहित्य अकादमी पुरस्कार; ‘लाेकमत’चे संजय वाघ यांच्यासह प्रणव सखदेव, किरण गुरव मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:06 AM2021-12-31T07:06:22+5:302021-12-31T07:30:40+5:30
Sahitya Akademi Award : साहित्य अकादमीने किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ लघुकथासंग्रहाला अकादमीचा मुख्य पुरस्कार (१ लाख रूपये) मिळाला आहे.
नवी दिल्ली : साहित्य अकादमीचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी साहित्यासाठीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा लेखक किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव, आणि बाल साहित्यिक संजय वाघ यांचा समावेश आहे. संजय वाघ हे ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत उपवृत्तसंपादक असून, त्यांनी लहान मुलांसाठी आतापर्यंत विपुल लिखाण केले आहे.
साहित्य अकादमीने किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ लघुकथासंग्रहाला अकादमीचा मुख्य पुरस्कार (१ लाख रूपये) मिळाला आहे. साहित्य युवा अकादमी पुरस्कारासाठी प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. संजय वाघ यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
ज्येष्ठ लेखक इंद्रजित भालेराव, नागनाथ काेत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या परीक्षकांचा मराठी भाषेतील साहित्यासाठीच्या परीक्षकांमध्ये समावेश होता. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डाॅ. चंद्रशेेखर कंबार यांच्या अध्यक्षतेेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी पुरस्कारांची निवड व घाेषणा करण्यात आली. रोख ५० हजार रुपये व ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे ही तशी प्रत्येक लेखकासाठी सर्वोच्च आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. त्या आनंदाचा मी एक भाग झालो याचे अतीव समाधान आहे. आत्मविश्वास हरवलेल्या मुलांना प्रेरणा, उभारी मिळावी या हेतूने लिहिलेल्या 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीवर पसंतीची मोहोर उमटल्याने माझ्या लेखनाचे चीज झाले असे मला वाटते.
- संजय वाघ, बालसाहित्यिक
तिघा साहित्यिकांचे अभिनंदन : मराठीचा प्रवाह विविध साहित्यकृतींद्वारे आणखी समृद्ध करण्याचे काम अनेक लेखक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला यामुळे बळ मिळेल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री