साहित्य अकादमीने मौन सोडले
By admin | Published: October 24, 2015 04:52 AM2015-10-24T04:52:35+5:302015-10-24T04:52:35+5:30
डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी व अन्य पुरोगामी विचारवंतांची हत्या तसेच देशातील वाढती असहिष्णुता याविरोधात साहित्यविश्वातून उमटू लागलेले निषेधाचे
नवी दिल्ली : डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी व अन्य पुरोगामी विचारवंतांची हत्या तसेच देशातील वाढती असहिष्णुता याविरोधात साहित्यविश्वातून उमटू लागलेले निषेधाचे स्वर अधिकाधिक तीव्र होत असतानाच अखेर साहित्य अकादमीने शुक्रवारी आपले मौन सोडले.
अकादमीच्या येथील कार्यालयाबाहेर साहित्यिकांच्या दोन गटांची परस्परविरोधी निदर्शने सुरू असतानाच कर्नाटकातील पुरोगामी कलबुर्र्गी यांच्या हत्येचा निषेध करणारा व केंद्र व राज्य सरकारांना अशा घटनांविरुद्ध ठोस पावले उचलण्याचे आवाहन करणारा ठराव अकादमीने आपत्कालीन बैठकीत पारित केला. ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, ते त्यांनी पुन्हा स्वीकारावेत. शिवाय निषेधापोटी अकादमीचे राजीनामे देणाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही अकादमीने केले. दादरी हत्याकांड आणि देशातील वाढता जातीय तणाव या निषेधार्थ गेल्या काही दिवसांत देशभरातील सुमारे ५० साहित्यिकांनी आपले अकादमी पुरस्कार परत केले. अनेकांनी अकादमीच्या पदांचे राजीनामे दिले. याउपरही साहित्यिकांची स्वायत्त संस्था असलेल्या अकादमीने या मुद्द्यावर मौन बाळगले होते. तथापि या निषेधाची गंभीर दखल घेत, अकादमीने शुक्रवारी कार्यकारिणीची एक आपत्कालीन बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत २४ पैकी २० सदस्य सहभागी झाले. त्यांनी हा ठराव पारित केला. कार्यकारिणीचे सदस्य कृष्णास्वामी नचिमुतू यांनी ही माहिती दिली.
परस्परविरोधी निदर्शने
साहित्य अकादमीच्या नवी दिल्लीतील कार्यालयाबाहेर शुक्रवारी लेखकांविरुद्ध लेखक अशी निदर्शने पाहायला मिळाली. स्वत:ला पुरोगामी मानणाऱ्या लेखकांच्या एका गटाने एकीकडे देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या समर्थनार्थ ‘शोक मौन’ मोर्चा काढला. तर दुसरीकडे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणारा अन्य एक गट पुरस्कार परत करणाऱ्यांंविरोधात मैदानात उतरला. अकादमीच्या आपत्कालीन बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला पुरोगामी मानणाऱ्या लेखकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत ‘शोक मौन’ मोर्चा काढला. याचवेळी जॉइंट अॅक्शन ग्रुप नॅशनलिस्ट माइंडेड आर्टिस्ट्स अॅण्ड थिंकर्सनेही (जनमत) निदर्शने करीत, पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांमध्ये एक कवी आहेत. साहित्य अकादमीच्या पदावर त्यांचा डोळा होता. त्यात त्यांना अपयश आले. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्याऐवजी ही नियुक्ती थेट सरकारद्वारे व्हावी, असा सल्ला या कवीने दिला होता. कुठल्याही विचारधारेतून नव्हे तर स्वहितांसाठी काही साहित्यिकांनी सरकारविरुद्ध निषेधाचे हत्यार उपसले आहे, असा आरोपही जनमतने केला.
अकादमीचा ठराव
साहित्य अकादमी ही साहित्यिकांची आणि साहित्यिकांद्वारे संचालित होणारी संस्था आहे. अकादमी सर्व भाषिक साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कार करते. कुठेही साहित्यिकांवर होणारे हल्ले, अत्याचार निंदनीय आहेत. याविरोधात केंद्र व राज्य सरकारांनी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी अकादमी करते.
नऊ साहित्यिकांनी परत केले पुरस्कार
मुंबई - कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्यासह नऊ साहित्यिकांनी राज्य सरकारने त्यांना दिलेले पुरस्कार शुक्रवारी त्यांच्या रकमेसह मंत्रालयात जाऊन परत केले. पुरस्कार परत करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात गेलेल्या साहित्यिकांच्या भेटीसाठी ना मुख्यमंत्री समोर आले ना कोणी मंत्री.
त्यांनी आपले पुरस्कार एका अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले. यात प्रज्ञा दया पवार, हरिश्चंद्र थोरात, गणेश विसपुते, संभाजी भगत, ऊर्मिला पवार, मिलिंद मालशे, मुकुंद कुळे, येशू पाटील आणि वसंत पाटणकर यांचा समावेश होता. त्यांनी पुरस्काराचे धनादेशही परत केले.
सरकारकडून होत असलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि एकूणच दलित, अल्पसंख्यकांसह सर्वच समाजातील व्यक्तींचा जगण्याचा अधिकारच प्रतिगामी शक्ती आज हिरावून घेत आहेत. आणीबाणीच्या काळातही इतकी मुस्कटदाबी नव्हती.
- प्रज्ञा पवार