साहित्य महामंडळच सर्वांत मोठे असहिष्णू
By admin | Published: January 22, 2016 01:53 AM2016-01-22T01:53:59+5:302016-01-22T01:53:59+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेशी गद्दारी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षांच्या भाषणावर सेन्सॉरशिप लादण्याचा
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेशी गद्दारी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षांच्या भाषणावर सेन्सॉरशिप लादण्याचा हा अधिकार महामंडळाला कोणी दिला, साहित्य महामंडळच असहिष्णू आहे, अशा शब्दांत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी महामंडळावर शरसंधान साधले.
डॉ. सबनीस यांचे लिखित भाषण महामंडळाने छापले नाही. त्यामुळे स्वत: पुढाकार घेत हे भाषण छापून वितरित करण्याची वेळ संमेलनाध्यक्षांवर आली. महामंडळाने दिलेल्या सापत्न वागणुकीवर डॉ. सबनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. ते म्हणाले, ‘‘१५ जानेवारीला सकाळी भाषण दिल्यानंतर ते १६ जानेवारीला छापून येणे अपेक्षित होते. मात्र, रात्रीपर्यंत महामंडळाकडून काहीच हालचाल न दिसल्याने मी स्वत:च ते भाषण छापले. मात्र, सेन्सॉरशिपचे अधिकार महामंडळाला कुणी दिले. भाषण न छापण्याची ही बाब अत्यंत घातक, अशोभनीय आहे. महामंडळाने भाषण छापून आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
संमेलनाध्यक्षांचे भाषण आम्ही छापू
पुणे : भाषणातील वादग्रस्त मुद्यांमुळे महामंडळाने भाषण न छापण्याचा निर्णय घेतला असल्याचा संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेला आरोप फेटाळून लावत भाषणाची प्रत हातात पडण्यास विलंब लागल्यामुळे इच्छा असूनही भाषण छापता आले नाही, असे सांगत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी, भाषण न छापण्याला संमेलनाध्यक्षांनाच कारणीभूत ठरविले आहे. मात्र अजूनही आम्ही संंमेलनाध्यक्षांचे भाषण छापू, असे स्पष्टीकरणदेखील वैद्य यांनी दिले आहे.
संंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपले भाषण सेन्सॉर करण्याचा अधिकार महामंडळाला कुणी दिला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर भाष्य करताना डॉ. वैद्य म्हणाल्या, उद्घाटनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ग्रंथदिंडी सुरू असताना, सबनीसांचे भाषण आम्हाला मिळाले. १३५ पानी भाषण होते, ते आम्ही वाचायचे कधी आणि छापायला द्यायचे कधी, हा प्रश्न आमच्यासमोर होता. ही गोष्ट आम्हाला अशक्य वाटली. त्यामुळे महामंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून ते न छापण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये वादग्रस्त मुद्दे होते म्हणून आम्ही ते छापले नाही, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवला नाही असे सबनीस म्हणत आहेत, पण उलट त्यांनीच आमच्याशी संपर्क तोडला होता. तरीही संंमेलन यशस्वी झाले ना, असा प्रश्नही त्यांनी केला.