आशातार्इंच्या सुरेल मैफलीने जिंकले साहित्य संमेलन

By admin | Published: January 18, 2016 01:25 AM2016-01-18T01:25:29+5:302016-01-18T01:25:29+5:30

‘दया घना...’ अशा अवीट गोडीच्या गाण्यांनी, तसेच ‘रेशमांच्या रेघांनी...’ अशा बहारदार लावण्या सादर करून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी पिंपरीकरांचे मन जिंकले

Sahitya Sammelan won the Surail concerts of Ashatrayi | आशातार्इंच्या सुरेल मैफलीने जिंकले साहित्य संमेलन

आशातार्इंच्या सुरेल मैफलीने जिंकले साहित्य संमेलन

Next

विश्वास मोरे,  ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी
‘दया घना...’ अशा अवीट गोडीच्या गाण्यांनी, तसेच ‘रेशमांच्या रेघांनी...’ अशा बहारदार लावण्या सादर करून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी पिंपरीकरांचे मन जिंकले. आशातार्इंच्या अत्यंत, चिरतरुण, तजेल आवाजाची मोहिनी वयाच्या ८४व्या वर्षीही कायम असल्याचे दिसून आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सायंकाळी आशाताई भोसले यांची संगीत रजनी झाली. शहरात पहिल्यांदाच संगीत रजनी होत असल्याने मंगेश पाडगावकर सभागृह तुडुंब गर्दीने भरले होते. व्यासपीठाबाहेरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. रात्री आठच्या सुमारास संगीत रजनीस सुरुवात झाली. ऋषिकेश रानडे यांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी सादर केलेले ‘सूर निरागस हो...’ हे गीत सादर केले. त्यानंतर आशाताई व्यासपीठावर आल्या. रसिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्यांची दाद दिली. सोनेरी आणि चंदेरी किनार असलेली फिकट गुलाबी साडी परिधान केलेल्या भोसले यांनी रसिकांना हात उंचावून अभिवादन केले. हा या शहरातील माझा पहिलाच शो मला खूप आनंद झाला आहे. सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संगीताची मैफल सुरू झाली. ती सव्वादोन तास सुरू होती. रसिकांशी संवाद साधत, गाण्यांच्या मिश्कीलपणे आठवणी सांगत तार्इंनी मैफल यादगार केली. लतादीदींचा आवाज काढत टाळ्यांची दाद घेतली. माझ्या गायनाची सुरुवात मी आमच्या कुटुंबाचे दैवत श्रीमंगेशाला वंदन करून करते. ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश...’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘चांदणे शिंपीत जा...’, ‘ये रे घना ये रे घना...’ हे गीत सादर केले. वयाच्या ८४व्या वर्षीही आशातार्इंचे गाणे तरुण असल्याचे जाणवत होते. त्यानंतर आशातार्इंनी लतादीदींनी गायलेले ‘अवचिता परिमळू....’ हे गीत सादर केले. त्यानंतर बाबूजींनी संगीतबद्ध केलेले ‘जीवलगा कधी रे येशील तू...’, ‘चांदण्यात फिरताना...’, हे गीत गाऊन मैफलीत रंग भरला. प्रेक्षकांमधून व्हिडीओ चित्रीकरण सुरू असल्याचे आशातार्इंच्या लक्षात आले. त्यांनी चित्रीकरण करू नये, अशी विनंती केली. मात्र, चित्रीकरण सुरूच राहिल्याने त्यांनी काही काळ कार्यक्रम थांबविला. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेऊन पुन्हा आशाताई गाणे सादर करायला मंचावर आल्या, त्या वेळी त्यांनी गोल ठिपक्यांची लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यानंतर आशातार्इंनी ‘नाच नाचुनी अति मी दमले...’ ही गीत सादर केले. त्यानंतर लावणीची फर्माईश करताच आशातार्इंनी वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ‘बुगडी माझी सांडली गं...’ ही लावणी सादर केली. त्यावर रसिकांमधून वन्स मोअर असा आवाज आला. त्यानंतर आशातार्इंनी ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती...’, ‘गोमू संगतीनं...’, ‘गेले राहून गेले...’, ‘रेशमांच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...’ अशी गाणी आणि लावणी पेश करून रसिकांची दाद घेतली. गानवैशिष्ट्यांच्या आठवणी सांगत सुधीर गाडगीळ यांच्या मैफलीत रंग भरला. आशातार्इंना बोलते केले. रसिक-श्रोत्यांच्या तुडुंब उत्साहात कार्यक्रमात रंगत आणली.

Web Title: Sahitya Sammelan won the Surail concerts of Ashatrayi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.