कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:12 PM2020-05-08T12:12:54+5:302020-05-08T12:19:21+5:30
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून या लढ्यात खारीचा वाटा उचलावा....
पुणे /वसई : आपला भारत देश आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. महाराष्ट्र सरकारही फार चांगल्या रीतीने कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, या भावनेतून साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी एक लाख एकवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वसई तहसीलदारांकडे सुपूर्द केला. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून या लढ्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीदिनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारातील रक्कमेच्या माध्यमातून कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा हात पुढे केला. प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे फादर दिब्रिटो यांच्या विनंतीला मान देऊन वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंडळ अधिकारी कुमार होगडे यांना फादर यांच्या घरी पाठवून धनादेश स्वीकारला.
याबाबत फादर दिब्रिटो म्हणाले, 'सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्रात दररोज रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. नागरिक म्हणून सद्यस्थितीत प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे सरकारच्या मदतीसाठी उभे ठाकले पाहिजे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये खारीचा वाटा उचलल्यास शासनाच्या माध्यमातून सर्व यंत्रणा या संकटाचा अधिक सक्षमपणे सामना करू शकतील. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आणि राज्याचा एक नागरिक म्हणून मी मला मिळालेल्या पुरस्कारातील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तहसीलदारांकडे सुपूर्द करत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मदतीचा हात दिल्यास हा लढा एकत्रितपणे लढणे सोपे होईल आणि वैद्यकीय सुविधा सुधारण्यास सुरुवात होईल.'