साई संस्थानच्या निधीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा!

By admin | Published: April 14, 2015 01:09 AM2015-04-14T01:09:12+5:302015-04-14T01:09:12+5:30

साईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.

Sai institution funds should be used for the benefit of the beneficiaries! | साई संस्थानच्या निधीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा!

साई संस्थानच्या निधीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा!

Next

डॉ़ आंबेडकरांनी व्यक्त केली होती अपेक्षा
प्रमोद आहेर - शिर्डी
साईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. याबाबतच्या आठवणींना शिर्डीकर आजही उजाळा देत आहेत़
२३ ते २६ जानेवारी १९५४ दरम्यान मुंबईत आयोजित साईभक्त संमेलनाचे उद्घाटन डॉ़ आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आले होते़ केंद्रीय गृह खात्याचे उपमंत्री दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई, रामकृष्ण मिशनचे स्वामी संबुद्धानंद, महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे, प्राचार्य ए़आऱ वाडिया आदींची उपस्थिती होती़ या वेळी डॉ़ आंबेडकर यांनी संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती़
धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत, एवढेच नव्हेतर धर्माच्या नावाने पैसा जमा करून तो वाटेल त्या कामी खर्च करणे, हा सध्या अनेकांचा व्यवसाय बनला आहे़ देशात दैन्य व दारिद्य्र इतके बोकाळले आहे की, धर्माच्या नावाने पैसा जमवून तो ब्राह्मण भोजनासाठी किंवा यात्रेकरूंना पोसण्यासाठी खर्च करणे गुन्हा आहे, असे आपण मानत असल्याचे परखड मतही डॉ़ आंबेडकर यांनी तेव्हा व्यक्त केले होते़ या देशात धर्माला वेळोवेळी वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे़ मूर्तीची, साधूसंतांची पूजा करणे किंवा त्यांच्या नादी लागणे हीच सध्या आपल्या धर्माची भिन्नभिन्न स्वरूपे आहेत़ मानवी मनाची ही अत्यंत खालावलेली अवस्था असल्याचे सांगत डॉ़ आंबेडकरांनी धर्माला पूर्वीचे सोज्वळ व पवित्र स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहनही या वेळी भावी पिढीला केले़

आपण साईबाबांचे भक्त किंवा अनुयायी नसल्याचे किंवा त्यांना पाहिलेही नसल्याचा खुलासा करत बाबा समाधीस्त झाल्यानंतरही भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे डॉ़ आंबेडकरांनी सांगितले़ या भक्त संमेलनात संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या भजन-प्रवचनाचेही कार्यक्रम झाले होते़

Web Title: Sai institution funds should be used for the benefit of the beneficiaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.