सुवर्ण ठेव योजनेबाबत साई संस्थानचे कानावर हात
By admin | Published: December 14, 2015 02:52 AM2015-12-14T02:52:48+5:302015-12-14T02:52:48+5:30
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे अनिल कवडे यांनी स्पष्ट केले.
शिर्डी (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे, जिल्हाधिकारी व साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य अनिल कवडे यांनी स्पष्ट केले.
साईबाबा संस्थान २०० किलो सोने या योजनेत ठेवणार असल्याचे वृत्त, मुंबईतील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केल्याने शिर्डीत दिवसभर चर्चा झाली. मात्र, त्याबाबत साई संस्थानमध्ये कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही. ही योजना संस्थानच्या हिताची असली, तरी संस्थान सध्या हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली आहे. कोर्टाने सोने वितळवण्यास २०१२ मध्येच स्थगिती दिली आहे़ त्यामुळे या योजनेत सोने गुंतवायचे असल्यास कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. व्यवस्थापनाला ठराव करून कोर्टाच्या मान्यतेसाठी पाठवावा लागेल. (प्रतिनिधी)
साईबाबा संस्थानकडे सुमारे ३८० किलो सोने आहे. त्यात सुमारे ११० किलोचे सुवर्ण सिंहासन आहे, तर अंदाजे पाऊणशे किलोमध्ये ४३ किलो सोन्याची नाणी व उर्वरित सार्इंच्या रोजच्या वापरातील वस्तू आणि आभूषणे आहेत़ त्यामुळे निर्णय झालाच तर संस्थान केवळ दोनशे किलो सोने या योजनेत गुंतवू शकते़ त्यातील सोने वेगवेगळ्या कॅरेटचे आहे़ त्यामुळे सोने वितळवून हे वजन आणखी कमी होणार आहे़