स्वच्छतेत शिर्डीचं साई मंदिर देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 09:29 AM2019-10-03T09:29:34+5:302019-10-03T09:31:34+5:30
महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
शिर्डी : जगप्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईमंदिर स्वच्छ मंदिराच्या सर्व्हेत देशात अव्वल ठरले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल, महात्मा गांधींच्या १५० जयंती दिनी, सायंकाळी एका शानदार कार्यक्रमात साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्वच्छतेचा हा पुरस्कार स्वीकारला.
'इंडिया टुडे'ने देशभरातील एक हजार मंदिराचा स्वच्छतेबाबत सर्व्हे केला होता. छाननीनंतर त्यातील सहा मंदिर उरली होती. त्यात साई मंदिराचा समावेश होता. अखेरच्या अटीतटीच्या निवडीत साई मंदिराने बाजी मारली व देशात स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला. साई मंदिराने अगोदरच आयएसओ मानांकन मिळवलेले आहे, या मंदिराला रोज सरासरी साठ हजाराहून अधिक भाविक भेट देतात. काही महत्त्वाच्या दिवसांमध्ये साई मंदिराला दीड ते दोन लाख भाविक भेट देतात.
स्वच्छतेसाठी करण्यात आलेला तंत्रज्ञानाचा वापर आणि चौकटीबाहेर जाऊन राबवण्यात आलेल्या उपाययोजना यासाठी साई मंदिराला हा पुरस्कार देण्यात आला. सुरेश हावरे यांची तीन वर्षांपूर्वी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांनी स्वच्छतेला महत्त्व देत मंदिराचा चेहरामोहरा बदलला. त्यांनी व्हिआयपी संस्कृती संपवली आणि निधीचा अतिशय योग्यपणे वापर केला, अशा शब्दांमध्ये साई संस्थानचं कौतुक करण्यात आलं आहे.