साई मंदिर, जागांचे हस्तांतरण बेकायदा
By Admin | Published: March 7, 2017 04:36 AM2017-03-07T04:36:15+5:302017-03-07T04:36:15+5:30
साईबाबा संस्थानने गेल्या शंभर वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली
प्रमोद आहेर,
शिर्डी- साईबाबा संस्थानने गेल्या शंभर वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर राहाता तहसीलदारांनी संस्थानच्या ताब्यातील या जागा नियमानुकूल करण्यासाठी जवळपास चार कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस बजावल्याचे शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आगामी सहा महिन्यांनंतर साईसमाधी शताब्दी सोहळा सुरू होत आहे़ त्या पार्श्वभूमीवर ‘शिर्डी गॅझेटिअर’ (‘अनटोल्ड स्टोरीज’‘ साईआगमन ते समाधी शताब्दी ’) या संदर्भ ग्रंथासाठी मंदिर व परिसराची माहिती देताना प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांच्या ही बाब लक्षात आली़ त्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राहुल कोताडे व अभिलेख कक्षातील कर्मचाऱ्यांनी गेले तीन दिवस १९०० पासूनच्या ब्रिटीशकालीन कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर संस्थानच्या ताब्यातील विशेषत: मंदिर व परिसरातील मोफत सर्व्हे क्रमांक एकमधील अनेक जागांचे हस्तांतरण अनधिकृतपणे झाल्याचे व त्या माध्यमातून शर्तभंग झाल्याचे निदर्शनास आले़
जवळपास २६़ ७१ गुंठे जागेच्या व्यवहारात शर्तभंग झाल्याचा नोटिसीत उल्लेख आहे. या जागा नियमानुकूल करण्यासाठी मूल्यांकनाच्या ७५ टक्के रक्कम (३ कोटी ९० लाख ६३ हजार) शासन जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम संस्थानकडून का वसूल करण्यात येऊ नये किंवा शर्तभंग प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव का पाठविण्यात येऊ नये, याबाबतचा लेखी खुलासा सात दिवसांत करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार माणिक आहेर यांनी या नोटिसीद्वारे दिला आहे़
।दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात संस्थानने लँड रेकॉर्डवर पुरेसे लक्ष दिले नाही़ आता बाबांच्या समाधीला शंभर वर्षे होत असताना ही बाब समोर आली़ या निमित्ताने संस्थानच्या जागांचे रेकॉर्ड दुरूस्त होऊन कायदेशीर होऊ शकेल.
-कुंदन सोनवणे, प्रांताधिकारी
अद्याप नोटीस मिळालेली नाही़ मात्र अनेक वर्षांपूर्वींचा विषय आहे़ याबाबत अभ्यास करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- बाजीराव शिंदे , संस्थानचे कार्यकारी अधिकारी