साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटींचा निधी द्या; बीडकरांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:36 AM2020-01-21T11:36:16+5:302020-01-21T11:36:55+5:30
तसेच किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते
बीड - श्री साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला असताना यामध्ये आता बीडकरांनीही उडी घेतली आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे.
याबाबत एबीपी माझाशी बोलताना बीडचे साईभक्त पाटणकर यांनी सांगितले की, साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. ४ ते ५ वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती. एवढा असामान्य माणूस अशाप्रकारे लाज न बाळगता काम करतो हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.
साईंचा जन्म पाथरीच्या भुसारी कुटुंबातील; उंबरखेडमध्ये झाले आध्यात्मिक शिक्षण
साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही?
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद
तसेच किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते, असे संत एकाजागी कधी थांबत नाही, त्यांचा जन्म पाथरीत झाला, अवलिया गुरुसोबत ते फिरत फिरत बीडमध्ये आले होते. दासगणू महाराजांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले, याठिकाणी त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेऊन तिथून ते शिर्डीला गेले, मी ब्राम्हणकुळात जन्माला आलो, माझा जन्म पाथरीत झाला असं साईबाबांनी म्हाळसापतींना सांगितलं होतं याचा उल्लेख आहे. शिर्डीत आर्थिक स्त्रोत खूप झाला. पाथरी उपेक्षित राहिली. पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे असं त्यांनी सांगितले.
साईबाबा जन्मस्थळ वादावर पडदा; पाथरीला देणार तीर्थक्षेत्राचा निधी
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं?
दरम्यान, शिर्डीत मोठं अर्थकारण आहे. मराठवाड्यात अनेक संत जन्मला आले. साईचरणी नतमस्तक होण्याची भावना साईभक्तांची असते. त्यामुळे शिर्डीला पायी दिंडी काढण्यापेक्षा बीड ते पाथरी दिंडी काढण्याचा विचार करणार आहोत. पाथरीला १०० कोटी दिले तसेच आम्हालाही १०० कोटी रुपये द्यावेत कारण साईबाबा यांची कर्मभूमी बीड आहे अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.