साईचरणी अर्पिलेले सोने वितळवणार; २.७१ कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:51 AM2024-01-20T11:51:40+5:302024-01-20T11:51:54+5:30
साई संस्थानकडे साईबाबांचे सुवर्ण सिंहासन व दैनंदिन वापरातील सोन्याच्या वस्तूसह संस्थान तिजोरीत जवळपास ४७० किलो सोने आहे.
मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानकडील ३१ मार्च २०१६ अखेर वितळविण्यासाठी योग्य असलेले सोने वितळवून त्यापासून नाणी / पेंडंट तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या २ कोटी ७१ लाख ७८३३ रुपयांच्या खर्चास विधी व न्याय विभागाने शुक्रवारी मंजुरी दिली.
विधी व न्याय विभागाने मे २००७ मध्ये एक जीआर काढला होता. त्यानुसार श्री साईबाबा संस्थानला देणगी रुपाने मिळणाऱ्या सोने-चांदीच्या अलंकारांपैकी अति उत्कृष्ट कलाकुसरीचे व सदैव जतन करून ठेवणे योग्य असणारे अलंकार वगळून सोने-चांदीच्या इतर वस्तू / दागिने वितळविण्यास मान्यता देत त्यापासून श्री साई प्रतिमा असलेली नाणी, पेंडंट आणि श्री साई पादुका बनविण्याची अनुमती देण्यात आली होती. संस्थानकडे ४७० किलो सोने आहे.
संस्थानकडील दागिने
साई संस्थानकडे साईबाबांचे सुवर्ण सिंहासन व दैनंदिन वापरातील सोन्याच्या वस्तूसह संस्थान तिजोरीत जवळपास ४७० किलो सोने आहे.
त्यातील वितळण्यायोग्य सोने २५५ किलो आहे. ते वितळवून २४० किलो सोने तयार होईल. याशिवाय, संस्थान तिजोरीत अंदाजे ६ हजार किलो चांदी आहे. संस्थानच्या विविध सरकारी बँकांत जवळपास २७०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.