पंकजा मुंडेंच उपोषण म्हणजे 'नौटंकी' : इम्तियाज जलील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:58 PM2020-01-27T12:58:43+5:302020-01-27T12:59:28+5:30
भाजप सरकारच्या काळात राज्यात आणि मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर होता. मात्र असे असताना सुद्धा भाजपला त्यावर नियोजन करता आले नाही.
औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु झाले आहे. या उपोषणाला भाजपच्या अनेक नेत्यांची उपस्थित पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या लाक्षणिक उपोषणावरून एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
एक मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, काही राजकीय नेत्यांना जनता मूर्ख असल्याचे वाटत आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेत्यांकडून आज औरंगाबादमध्ये होत असलेले उपोषण. सत्ता असताना मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवला नाही, मात्र आता उपोषण करून 'नौटंकी' करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला.
गेल्यावेळी राज्यात आणि केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता होती. विशेष म्हणजे याच भाजप सरकारच्या काळात राज्यात आणि मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर होता. मात्र असे असताना सुद्धा भाजपला त्यावर नियोजन करता आले नाही. जेव्हा काम करण्याची संधी होती त्यावेळी कामे केली नाही, मात्र विरोधात येताच काम होत नसल्याचे आरोप करून उपोषण करून भाजपचे नेते जनतेला मूर्ख समजत आहे का ? असा प्रश्न जलील यांनी यावेळी उपस्थित केला.
पंकजा मुंडेंच्या या एक दिवशीय उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंसह भाजपचे अनेक नेते उपस्थित आहे.