राज्यपालांनी भाजपलादेखील दिली नाही वेळ वाढवून: मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:57 AM2019-11-13T10:57:58+5:302019-11-13T11:00:30+5:30
फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याचा खुलासा खुद्द भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
शिवसेनेला दिलेल्या मुदतीच्या आत पाठींब्याचे पत्र सादर करता न आल्याने त्यांनी राज्यपाल यांच्याकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली होती. त्यांनतर राज्यपालांवर शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसकडून पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपला सुद्धा 24 तासाच्या वरती वेळ देता येणार नसल्याचे राज्यपालांकडून सांगण्यात आले होते, याचा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला वेळ वाढवून मिळाला नसल्याचे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले आहे.
शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी मंगळवारी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली होती.
शिवसेना राष्ट्रवादीला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला असल्याचे बोलले जात असताना, भाजपला सुद्धा वेळ वाढवून देण्यासा राज्यपालांनी नकार दिला असल्याचे समोर आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले की, राज्यपालांकडे आम्ही वेळ वाढवून देण्याची लिखित स्वरूपात मागणी केली होती. मात्र त्यांनी आम्हाला वेळ वाढवून देण्यासा नकार दिला होता. तसेच 24 तासाच्या वरती कुणालाच वेळ देता येणार नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले असल्याचे सुद्धा ते म्हणाले.