सीईटी परीक्षेत ‘सेल’च नापास; पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड, अनेकांची परीक्षेची संधी हुकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:06 AM2022-08-03T07:06:40+5:302022-08-03T07:06:54+5:30
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारपासून सीईटी परीक्षांना सुरुवात झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळी आणि दुपारच्या सत्रात तांत्रिक व सर्व्हर नेटवर्किंग बिघाडामुळे काही विद्यार्थ्यांची परीक्षा खंडित झाली, तर काही ठिकाणी परीक्षा विलंबाने सुरू झाल्याची माहिती मिळाली. अनेक ठिकाणी तर विद्यार्थ्यांना लॉगिनही करता न आल्याने त्यांची परीक्षेची संधी हुकली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात बीएड- एमएड (३ वर्षीय), बीपीएड, विधी (५ वर्षीय), तर दुपारच्या सत्रात एम. आर्क., एम. एड., विधी (५ वर्षे) आणि पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट या परीक्षा पार पडल्या. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागला.
उडाला गोंधळ
nठाण्यातील कासारवडवली परीक्षा केंद्रात ६० विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत.
nराज्यातही काही ठिकाणी अशाच तक्रारी आल्या.
nअनेकांना तर लॉगिनही करता आले नाही.
तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा होऊ शकली नाही किंवा पूर्ण होऊ शकली नाही, अशा विद्यार्थ्यांची पडताळणी करून त्यांची फेरपरीक्षा योग्य वेळी पुनर्नियोजित करण्यात येईल. त्याची सूचना सीईटी सेलमार्फत देण्यात येणार आहे.
- रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल