उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का; पण कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:48 PM2024-09-03T15:48:45+5:302024-09-03T15:49:32+5:30
कल्याणमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी धक्का दिला आहे. याठिकाणचे शिंदेंचे समर्थक असलेले तरे यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीनिमित्त अनेक स्थानिक नेते पक्षांतर करत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे. कल्याणमध्येही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ तरे यांना ठाकरे गटात प्रवेश देत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना धक्का दिल्याचं बोललं जातं. मातोश्री निवासस्थानी साईनाथ तरे यांचा पक्षप्रवेश पार पडला. मात्र या प्रवेशाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.
तरे यांच्या पक्षप्रवेशापूर्वी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, खालील स्वाक्षऱ्या करणारे जिल्हा शहर पदाधिकारी आज कल्याण शहर शाखेत स्वयंप्रेरणेने झालेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी खालील ठराव सर्वानुमते संमत केले आहेत. तरी आपण या ठरावांचा सहानुभुतीपूर्वक विचार करावा अशी विनंती पत्राद्वारे केली.
काय होता ठराव?
आजच्या होऊ घातलेल्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे अडीच वर्ष इमाने इतबारे काम करणाऱ्या संघटनेच्या कामासाठी स्वकष्टाने, घामाने कमावलेला पैशाचा वापर करणाऱ्या, अंगावर गुन्हे घेणाऱ्या दबाव स्वीकारणाऱ्या निष्ठावंतांच्या भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. संघटना अशा प्रवेशाने स्तब्ध झालीय.
बलात्काराचे गुन्हे असणाऱ्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख श्री साईनाथ तरे यांना प्रवेश देण्याने संघटनेच्या सामाजिक, निष्ठेच्या चेहऱ्याला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज प्रवेश करत असलेल्या तारे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायले नगर, खडकपाडा या त्यांच्या परिसरात आपल्या शिवसैनिकांना दमदाटी करून त्यांना बुथदेखील लावून दिले नाहीत. या गोष्टीचा संघटनेवर, शिवसैनिकांवर खोलवर परिणाम झाला होता.
निष्ठावंतांच्या निष्ठेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील निष्ठा कायम राखण्यासाठी यापुढे असे प्रवेश करण्यात येऊ नये.
गद्दार गटातून येणारी माणसे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेसाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी संघटनेत येत असतील तर त्यांच्या पापाचे प्रायश्चित म्हणून त्यांचे खरे उद्देश सिद्ध करण्यासाठी त्यांना पुढील १ वर्ष संघटनेचे कुठलेही पद देण्यात येऊ नये. येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचा विचार करण्यात येऊ नये
याबाबतचे ठराव करून अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंना शहरातील पदाधिकाऱ्यांनी दिले. मात्र कार्यकर्त्यांची ही नाराजी ओढावून उद्धव ठाकरेंनी साईनाथ तरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने आगामी काळात ठाकरे गटाचे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.