संततधारेने शहरवासीयांची तारांबळ
By admin | Published: September 21, 2016 03:13 AM2016-09-21T03:13:06+5:302016-09-21T03:13:06+5:30
सोमवारपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांचे हाल झाले.
नवी मुंबई : सोमवारपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांचे हाल झाले. नवी मुंबईबरोबरच खारघर, पनवेल, उरण परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारपासून वातावरणात काहीसा बदल झाला असून हवेत गारवा पसरला आहे. सकाळी कामावर जाणार नोकरदारवर्ग, शाळकरी विद्यार्थ्यांची मात्र तारांबळ उडाली, पावसाने क्षणभरही विश्रांती न घेतल्याने भुयारी मार्ग,बसस्थानके तसेच सखल पाणी साचल्याच्या घटना घडल्या.
पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती त्यामूळे प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील टेकडीवर असलेले मोठे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महापालिका आपत्कालीन विभाग तसेच अग्नीशमन दलाच्या वतीने या ठिकाणी तात्काळ भेट देऊन प्रवाशांच्या मार्गातील अडथळा दूर केला. सकाळी साडेआठ वाजेपासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत बेलापूर विभागात ४५.० मिमी, नेरुळमध्ये ४७.०मिमी, वाशीत ६१.५ मिमी, ऐरोलीत ५४.०२ मिमी असा एकूण ५२.०२ मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरणची जलपातळी ८३.४८मीटर इतकी नोंद झाली. ऐरोली सेक्टर ५ येथील मार्केट परिसरात कचरा अडकून नाला तुंबल्याची घटना घडली. रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याने रेल्वे प्रवाशांना फारसा अडचणींचा सामना करावा लागला नाही. खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांचे हाल झाले.