संशोधनाची प्रेरणा देणारे संत नामदेव अध्यासन

By Admin | Published: April 2, 2015 03:14 AM2015-04-02T03:14:02+5:302015-04-02T03:14:02+5:30

त त्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी महाराष्ट्रात या कार्याला वाहिलेले संत नामदेव अध्यासन असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Saint Namdev Adhyasan, inspiring research | संशोधनाची प्रेरणा देणारे संत नामदेव अध्यासन

संशोधनाची प्रेरणा देणारे संत नामदेव अध्यासन

googlenewsNext

त त्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी महाराष्ट्रात या कार्याला वाहिलेले संत नामदेव अध्यासन असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ती अमलात आणली. १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (तेव्हा पुणे विद्यापीठ) संत नामदेव अध्यासनाची स्थापना झाली.
प्राचीन व मध्ययुगीन साहित्याचे अभ्यासक, संत नामदेव समाजातील मान्यवर, अनुसूचित जमातीतील तज्ज्ञ, शीख समाजाचे प्रतिनिधी आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी अशी एक सर्वसमावेश जाणकारांची समिती विद्यापीठाने नेमली व ध्येयधोरणे ठरवली. २ नोव्हेंबर १९८५ला पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
विद्यापीठातील अध्यासन हे विद्यापीठ आणि समाज यांना एकत्र आणणारे एक संशोधन केंद्र असते. डॉ. अशोक कामत यांनी ही जाणीव ठेवून संत नामदेव अध्यासनाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले. अनेक नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळविले. अध्यासनाचे ग्रंथालय सुसज्ज केले. अध्यासनाच्या ग्रंथालयात सुमारे दहा हजारांहून अधिक दुर्मिळ असे संशोधनमूल्य असलेले संदर्भग्रंथ आहेत. भारतीय संत साहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. संशोधन सहायक डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांच्यासह डॉ. सुमती देशपांडे, डॉ. सुनीती तांबे, डॉ. पद्मावती श्रोत्रीय, डॉ. आशा परांजपे, डॉ. अनिता केळकर, डॉ. आशा राशिंगकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. सरोज सबनीस इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
परमहंस श्रीस्वामी स्वरूपानंद मंडळ व कै. मधुसूदन अच्युत केळकर ट्रस्ट या संस्थाच्या निधीतून अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. डॉ. वि. रा. करंदीकर, प्रा. पां. ना. कुलकर्णी, डॉ. द. गं. कोपरकर, डॉ. ग. वा. तगारे, श्री. कृष्णा मेगसे, प्रा. श्री. मा. कुलकर्णी, डॉ. प्र. न. जोशी, श्री. रवींद्र भट, डॉ. बालाजी तांबे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. श्रीपाल सबनीस इत्यादी मान्यवरांना आजवर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. आजवर श्री. प्र. द. निकते, डॉ. विलास खोले, प्रा. वा. ल. मंजूळ यांना हे पुरस्कार व शिष्यवृती देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. ही धुरा मी सांभाळत असताना पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ एकोणिसाव्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली. ‘भारतीय धर्म-संप्रदाय, तत्त्वज्ञान आणि साहित्य’ यावर व्याख्यानमाला घेतली. ‘नामदेव साहित्यावरील लेखनसूची’लाही प्रारंभ केला आहे.
(लेखक संत नामदेव अध्यासनाचे
माजी प्रमुख आहेत.)

 

Web Title: Saint Namdev Adhyasan, inspiring research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.