मुंबईतील सराईत घरफोडी टोळीस अटक
By admin | Published: July 15, 2015 12:50 AM2015-07-15T00:50:00+5:302015-07-15T00:52:37+5:30
दोन महिलांसह सातजणांचा समावेश : आलिशान गाडीसह हत्यारे जप्त
कोल्हापूर : पर्यटनास आल्याचे भासवून शहरातील बंद दुकाने मध्यरात्रीच्या दरम्यान फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या मुंबईतील घरफोड्या टोळीस मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये दोन महिलांसह सातजणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक आलिशान गाडी व घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त केली.
संशयित आरोपी महंमद आरीफ अब्दुलहब शेख (वय २९), विजय सूर्या शेट्टी (४०), दीपक मना डे (२९), किशोर चंद्रकांत साळवी (३०), विजय ऊर्फ मुन्ना विठ्ठल जागडे (३४), फातिमा फिरोज खान (२९), रमजानबी समास्तू अब्दुलहब शेख (२९, सर्व रा. मानखुर्द, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या सर्व आरोपींना आज, बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मीपुरी येथील संजय अशोक काजवे (३५) यांच्या मालकीचे गोल्डन टोबॅको नावाचे दुकान आहे. ४ जूनला मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८० हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी दुकानमालक काजवे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरट्यांचे छायाचित्र रेकॉर्डिंग झाले होते. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांचे फोटो काढून ते राज्यातील पोलिसांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठविले. यावेळी मुंबईतील एका पोलिसाने हे चोरटे मुंबईतील असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. या चोरट्यांवर नाशिक, सुरत, राजस्थान, आदी ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून, पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती हाती आली. त्यानुसार गुन्हे शाखेचे युवराज आठरे, कॉन्स्टेबल अजिज शेख, भारत कांबळे, राहुल देसाई, अजित वाडेकर, संदीप कापसे, अस्मिता सुतार, आदींचे पथक मुंबईला रवाना झाले. यावेळी मानखुर्द परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या या संशयित टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांना तेथून कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आलिशान गाडीमधून आम्ही सर्वत्र फिरत असतो. पर्यटनास आल्याचे भासवून मध्यरात्री बंद दुकाने फोडून दुसऱ्या शहरात जात असतो. अनेकवेळा रात्रीच्या वेळी गस्तीवरील पोलिसांनी आम्हाला अडविले होते. त्यावेळी गाडीमध्ये फॅमिली पाहून त्यांनी आम्हाला सोडून दिले होते. महिला व लहान मुले सोबत असल्याने आम्ही चोर आहोत, हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते, अशी कबुली दिली. आलिशान गाडीमध्ये घरफोडीसाठी लागणारे साहित्य त्यांनी ठेवले होते. रोज एका शहरात घरफोडी करून मिळणाऱ्या पैशातून ते चैनी करीत असत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.