मुंबईतील सराईत घरफोडी टोळीस अटक
By admin | Published: May 23, 2017 01:16 AM2017-05-23T01:16:54+5:302017-05-23T01:16:54+5:30
एका महिलेसह चौघांचा समावेश : कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रात गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : पर्यटनास आल्याचे भासवून शहरातील बंद दुकाने मध्यरात्रीच्या दरम्यान फोडून लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल लंपास करणाऱ्या मुंबईतील घरफोड्या टोळीस सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये एका महिलेसह सातजणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक आलिशान गाडी व घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे, चोरीचे मोबाईल, असा सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी लक्ष्मीपुरी, कोंडाओळ येथील मोबाईल शॉपीसह औषध दुकान फोडल्याची कबुली दिली असून यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संशयित आरोपी मुस्तफा अब्दुलहमीद पावसकर (वय ३६, रा. सिक्कीनगर, मुंब्रा, ठाणे), नुरमहंमद करीम शेख ऊर्फ लड्डू (४०, रा. कर्नाक बंदर, व्हीटी), दिनेश विजय मुदलियार (३५, रा. मस्जिद बंदर, पी. डी. माला रोड, व्हीटी), फातिमा फिरोज खान (३१, रा. कोळीवाडा, वडाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांना आज, मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथील ‘द सेल सिटी’ या दुकानासह औषध दुकान फोडून दोन लाख रुपये कि मतीचा मुद्देमाल चोरट्यांनी शनिवारी (दि. २०) लंपास केला होता. याप्रकरणी शाहीद महमद ढोले (वय २८, रा. दुधाळी पॅव्हेलियन) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. रात्रीत दोन दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात भीती पसरली होती. या घरफोडीचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजवरून क्वालिस गाडी (एमएच ०४ सीडी १४४५) लक्ष्मीपुरी परिसरात संशयितरीत्या फिरताना दिसून आली. प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांच्याकडून या गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता आरिफ जाफरअली शेख (रा. कौसा, ता. मुंब्रा, जि. ठाणे) याची असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या गुन्ह्णातील संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तत्काळ मुंबईला पाठविली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे, लक्ष्मीपुरीचे दादा पवार यांनी संयुक्तरीत्या कारवाईची आखणी करून गाडीमालक आरिफ शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दोन दिवसांपूर्वी मुस्तफा पावसकर याला गाडी भाड्याने दिल्याचे सांगितले. पावसकर याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. तो सिक्कीनगर येथे असल्याची माहिती मिळताच तेथून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत नुरमहंमद शेख, दिनेश मुदलियार, फातिमा खान मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन कोल्हापूरला आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली.
कोल्हापुरात दुसऱ्यांदा घरफोडी
लक्ष्मीपुरी येथील संजय अशोक काजवे यांच्या मालकीचे गोल्डन टोबॅको नावाचे दुकान आहे. ४ जून २०१५ ला मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८० हजार रुपये लंपास केले होते. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरट्यांचे छायाचित्र रेकॉर्डिंग झाले होते. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांचे फोटो काढून ते राज्यातील पोलिसांच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर पाठविले. यावेळी मुंबईतील एका पोलिसाने हे चोरटे मुंबईतील असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संशयित टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा कोल्हापुरात येऊन त्यांनी घरफोडी केली. त्यांच्या टोळीमध्ये आणखी काही संशयितांचा समावेश आहे.