साजगाव-आडोशी रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: July 21, 2016 02:59 AM2016-07-21T02:59:47+5:302016-07-21T02:59:47+5:30
खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला
खालापूर : खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या मार्गावरून खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्याची दुरु स्ती तरी करा, अन्यथा रस्ता कायमचा बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांकडून येत आहे. पुढील आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे खालापूर तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. वाहन चालविताना चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला तरी संबंधित खात्याला मात्र काहीच सोयरसुतक नाही याचा प्रत्यय साजगाव-आडोशी रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना येत आहे. हा रस्ता गेल्या वर्षी बनविण्यात आला होता. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही महिन्यातच पुन्हा उखडला आहे. खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना नावेत बसल्याचा अनुभव येत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या खड्ड्यांमुळे रस्ताच राहिला नसून अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
साजगाव-आडोशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. अनेक कारखान्यांमध्ये अवजड वाहनांची वाहतूक याच रस्त्यावरून होते. दरवर्षी या रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र अवजड वाहनांच्या क्षमतेचा रस्ता बनवला जात नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडतात. या रस्त्यावर ढेकू, टेंबेवाडी, होनाड, चिंचवली, आत्करगाव, आडोशी ही गावे असून अनेक वाड्याही आहेत. या परिसरातील लोकांना खोपोलीत विविध कामांसाठी यावे लागते. खोपोली ही बाजारपेठ असल्याने स्थानिकांनाही शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास नकोसा झाला असून स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षे स्थानिक रस्त्याचा हा त्रास भोगत असून पावसाळ्याचे आणखी काही महिने याच रस्त्यावरून प्रवास करावा लागणार असल्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
>बोरज फाटा - देवळे रस्त्याची चाळण
पोलादपूर : तालुक्यातील देवळे विभागात जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे, तर बोरज फाटा ते देवळे रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना रस्त्यावर कसरत करावी लागत आहे. लहुलसे, दाभिळ, करंजे, हलदुले, रानकडसरी, देवळे आदी गावांकडे हा रस्ता जातो. ३०० हून अधिक विद्यार्थी कापडे, पोलादपूर येथे शिक्षणासाठी येत असतात. तर पोलादपूर ही मुख्य बाजारपेठ असून व्यवसाय, उपचारासाठी पोलादपूरशिवाय पर्याय नसल्याने येथूनच जावे लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी पाठपुरावा करत असून कोणत्याही निधीची तरतूद झाली नसल्याचे सरपंचांनी सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली. आ. भरत गोगावले यांनी पावसाळ्यानंतर डागडुजी होईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.