सज्जन जिंदल रिफायनरी उभारण्यास उत्सुक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:26 AM2018-05-30T10:26:49+5:302018-05-30T10:26:59+5:30
पोलाद आणि समुद्री बंदरे यात यशस्वी झाल्यानंतर आता जेएसडब्ल्यू स्टील्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल कच्च्या तेलाची रिफायनरी उभारण्यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती जिंदल समूहाच्या निकटवर्ती सूत्रांनी दिली आहे.
सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलाद आणि समुद्री बंदरे यात यशस्वी झाल्यानंतर आता जेएसडब्ल्यू स्टील्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल कच्च्या तेलाची रिफायनरी उभारण्यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती जिंदल समूहाच्या निकटवर्ती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षी जेएसडब्ल्यू समूहाने कर्ज सापळ्यात अडकलेल्या भूषण स्टील्स या कंपनीचे अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्यानंतर आता सज्जन जिंदल यांनी रिफायनरी उद्योगाकडे मोर्चा वळवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या नाणार येथील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांकडून विरोध होतो आहे, त्यामुळे ही रिफायनरी विदर्भात हलवा अशी मागणी लोकमतचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे. दुसरी बाब म्हणजे राज्य सरकारने एक नवीन रिफायनरी उभारण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर सज्जन जिंदल रिफायनरी क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक आहेत ही बातमी उत्साहवर्धक आहे.
दरम्यान या बाबतीत सज्जन जिंदल यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता जिंदल विदेशात असल्याचे कळले.
मूळच्या हरियाणाच्या असलेल्या जिंदल समूहाने २०११ मध्ये कळमेश्वरच्या इस्पात इंडस्ट्रीजचे (पूर्वीची निप्पॉन डेन्रो इस्पात) अधिग्रहण केले, त्यामुळे कळमेश्वरचा कलर्ड शीटस् बनवण्याचा कारखाना व प. महाराष्टÑातील खोपोलीचा पोलाद कारखाना व गडचिरोलीतील भामरागड येथील आयर्न ओअरची खाण ही सध्या जेएसडब्ल्यू समूहाकडे आली. त्यानंतर जेएसडब्ल्यू समूहाने रत्नागिरीला बंदर उभारले आहे. समूहाची उलाढाल सध्या ८४,००० कोटी आहे. त्यामुळे जिंदल समूहाला विदर्भ नवा नाही.