उमेदवारीसाठी ‘वर्षा’वर खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 04:00 AM2017-01-30T04:00:58+5:302017-01-30T04:00:58+5:30
शिवसेना, भाजपा युती फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईतील भाजपा उमेदवारांची यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि पक्षाची रणनिती
मुंबई : शिवसेना, भाजपा युती फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईतील भाजपा उमेदवारांची यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
वर्षावरील या बैठकीस मुख्यमंत्र्यांसह या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी यांच्यासह मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भाजपा उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील सहा जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांतील सुमारे १२० उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली असून, उर्वरित उमेदवारांची यादी सोमवारी निश्चित करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपाच्या निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीत ५२७ जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली होती. त्याला आता अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. लवकरच भाजपाची यादी आणि जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती प्रवक्ते अतुल शाह यांनी दिली. भाजपाची मुंबईतील रणनितीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)