भाजीपाल्यासाठी बाहे गाव जिल्ह्यात अग्रस्थानी

By Admin | Published: April 7, 2017 02:41 AM2017-04-07T02:41:43+5:302017-04-07T02:41:43+5:30

भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे

For the sake of vegetables, Bahe village topped the district | भाजीपाल्यासाठी बाहे गाव जिल्ह्यात अग्रस्थानी

भाजीपाल्यासाठी बाहे गाव जिल्ह्यात अग्रस्थानी

googlenewsNext

मिलिंद अष्टिवकर,
रोहा- कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत चोखामेळाच्या वचनाप्रमाणे ज्या गावाने कर्म हीच देवपूजा मानून स्वत:चा चरितार्थ चालवून भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे असे रोहे तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गाव. कसदार व ताज्या भाजीसाठी केवळ रोहे तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला हेवा वाटावा असे हे गाव. गेल्या अनेक पिढ्यांपासून या गावाने आपला हा व्यवसाय जतन करून ठेवला आहे.
रोह्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या निसर्गरम्य कुंडलिका नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या शेतीमध्ये या गावात पिढ्यानपिढ्या भाजीपाल्याची शेती पिकविली जात आहे. भाजीपाला क्षेत्रातील सारी कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आहेत, तर आज या क्षेत्रात गावातील केवळ वडीलधारी मंडळीच नव्हे तर उच्चशिक्षित तरुणाईनेही आपापली नोकरी सांभाळून झोकून दिले आहे.
भाजीपिकांवर कितीही संकटे आली तरी येथील शेतकरी साऱ्या गोष्टींवर मात करीत किमान स्वत:च्या चरितार्थापुरते तरी उत्पादन घेताना दिसत आहेत. येथील भाजीपाल्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे साऱ्यांनाच येथील भाजीचे वेगळे आकर्षण आहे. उन्हाळी हंगामात नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी कित्येक एकराच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड करीत आले आहेत. रासायनिक खते व कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून केवळ अंगमेहनत व चिकाटीच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय टिकून ठेवला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपेक्षा येथील भाजीचा दर्जा चांगला असल्याने तसेच ताजी भाजी व किफायतशीर दर यामुळे ग्राहकांचीही पहिली पसंती या भाजीलाच येते.
उन्हाळी हंगामात भातशेतीला पाणी मिळत नाही. याशिवाय गावाच्या बाजूलाच एमआयडीसीत कारखाने आहेत. परंतु स्थानिकांना येथे कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने येथील शेतकरी व तरुण वर्गाने आपल्या हक्काची रोजीरोटी म्हणून भाजीपाल्याच्या शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. भाजीचे उत्पादन चांगले आले तर संपूर्ण वर्षभराच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो, तर कधी उत्पादन कमी आले तर फक्त तात्पुरता चरितार्थ चालतो. येथील शेतीमळ्यात पिकणारी भाजी शेतकरी डोक्यावर टोपले घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात फिरत असतात,तर रोह्याची बाजारपेठ तसेच विविध आठवड्यांचे बाजार येथे विकली जाते. काही वर्षांपासून पुणे, महाड, पेण, पनवेल व नवी मुंबई येथील घाऊक व्यापारी थेट शेतमळ्यावर येऊन भाजी खरेदी करीत असल्याने मालाला उठाव देखील चांगला होत आहे, याशिवाय श्रम व पैशांचीही चांगली बचत होत आहे. या व्यापारात शेतकरीवर्गाला बऱ्यापैकी आर्थिक लाभ होताना दिसत आहे. शेतकरी वर्गाने चालविलेला पिढीजात व्यवसाय आधुनिक काळात देखील आदर्शवत ठरत आहे.

Web Title: For the sake of vegetables, Bahe village topped the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.