संकटग्रस्त महिलांच्या मदतीला आता धावून येणार ‘सखी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:12 AM2018-04-01T01:12:09+5:302018-04-01T01:12:09+5:30
संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ठाणे, रायगडसह ११ जिल्ह्यांत ‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ अर्थात ‘सखी मदत कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या मदत कक्षात पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, समुपदेशन, पोलीस मदत आणि कायदेशीर सल्ला मोफत देण्यात येणार आहे.
- नारायण जाधव
ठाणे : संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ठाणे, रायगडसह ११ जिल्ह्यांत ‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ अर्थात ‘सखी मदत कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या मदत कक्षात पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, समुपदेशन, पोलीस मदत आणि कायदेशीर सल्ला मोफत देण्यात येणार आहे. मदत कक्षासाठी केंद्र शासनाने दोन कोटी २१ लाख ७५ हजारांची भरीव मदत दिली आहे.
केंद्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार ‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ची प्रायोगिक तत्त्वावर राज्यात २०१५ मध्ये पुण्याच्या मुंढवा येथील मुलींच्या शासकीय निरीक्षणगृहात सुरुवात केली होती. केंद्राच्याच मान्यतेने त्याचे नामकरण ‘सखी’ असे करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जिल्ह्यांत हा कक्ष सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये ठाणे, रायगडसह नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या केंद्रांसाठी जी दोन कोटी २१ लाख ७५ हजारांची मदत दिली आहे, त्यापैकी आठ लाख १९ हजार १२० रुपये पुणे येथे यापूर्वी सुरू केलेल्या सखी मदत कक्षास देण्यात येणार आहेत. उर्वरित निधी नव्याने मंजूर केलेल्या ११ जिल्ह्यांतील मदत कक्षांना देण्यात येणार आहे.
राज्याचे महिला आणि बालकल्याण आयुक्त आणि त्यात्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली हा मदत कक्ष कार्यरतअसेल. या मदत कक्षास चालू आर्थिक वर्षाच्या शेवटीच मान्यता दिल्याने ठाणे जिल्ह्यात तो कोठे असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्याची जागा निश्चित झाल्यावर तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. राजधानी मुंबईखालोखाल ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या असून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही लक्षणीय आहे. जिल्ह्यात सहा महापालिकांच्या क्षेत्रात दोन पोलीस आयुक्तालयांसह ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यक्षेत्र मिळून ७७ पोलीस ठाणी आहेत. सर्व शहरांत कष्टकºयांसह नोकरदार महिलांचे प्रमाण मोठे असून त्यांच्या मदतीला संकटकाळात सखी मदत कक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
पुढील आठवड्यात प्रस्ताव देणार
संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र सरकारची ही अतिशय चांगली योजना आहे. सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीडित महिलांना उपयुक्त ठरेल, अशा ठिकाणी हा सखी मदत कक्ष सुरू करण्यात येईल. यासाठी ठाणे महापालिकेकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा भूखंडांपैकी एखादा ३०० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड ताब्यात घेऊन ‘सखी मदत कक्ष’ सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील आठवड्यातच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन जागेसाठीचा प्रस्ताव त्यांना देण्यात येईल, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.