एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खाते आता खासगी बँकेत; एसटी महामंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:13 AM2022-07-21T08:13:22+5:302022-07-21T08:13:57+5:30
आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक आणखी अडचणीत येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाने भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकांशिवाय कर्मचाऱ्यांना फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँकेसारख्या खासगी बँकेमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक आणखी अडचणीत येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे बहुतांश व्यवहार स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून चालतात. पूर्वी एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये पगार खाते उघडणे बंधनकारक होते. मात्र, आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पगार खाते उघडण्यास सूट दिली आहे.
ज्यामध्ये भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेव्यतिरिक्त फेडरल बँक, एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय बँकेमध्ये वेतन खाते उघडण्याचा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याबाबत परिपत्रकसुद्धा काढण्यात आले आहे.
अशी आहे स्टेट ट्रान्सपोर्ट बँक
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक ही पगारदार आणि नोकरदाच्या बँकांमध्ये अग्रणीय बँक म्हणून गणली जात होती. बँकेच्या राज्यभरात ५२ शाखा आहेत तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. बँकेचे ८५ हजार एसटी कर्मचारी सभासद आहेत. त्यातील ३५,००० एसटी कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत, त्यांचे येथून वेतन होते. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना भारतीय स्टेट बँकेमधून वेतन मिळते.
कर्जावरील व्याजाचा दर जास्त
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचा दर ११. ४० टक्के आहे. तर इतर राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बँकांचा कर्जावरील व्याजदर तुलनेत कमी आहे, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या एकूण कार्यपद्धतीबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाने इतर बँकांमध्ये वेतन खाते देण्यास परवानगी दिली.
कर्ज घेतले असल्यास ना हरकत आवश्यक
ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेमधून कर्ज घेतले आहे, त्यांना इतर बँकेत वेतन खाते उघडण्यापूर्वी संबंधित बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे इतर बँकेत बचत खाते आहे, त्यांना तेच खाते वेतन खात्यात बदलता येऊ शकते.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्जाचे व्याजदर कमी न केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. इतर बँकांच्या स्पर्धेत उतरून या बँकेने व्याजदर ठेवायला हवा होता. आता इतर बँकेत वेतन खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने कर्मचारी त्यांचे वेतन इतर बँकेतून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस