बेस्ट कामगारांचा पगार २० जूनला
By admin | Published: June 16, 2017 01:37 AM2017-06-16T01:37:49+5:302017-06-16T01:37:49+5:30
आर्थिक संकटामुळे गेले काही महिने बेस्ट कामगारांना रडतखडत पगार देणाऱ्या बेस्टने या वेळेस मात्र तजवीज केली आहे. त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक संकटामुळे गेले काही महिने बेस्ट कामगारांना रडतखडत पगार देणाऱ्या बेस्टने या वेळेस मात्र तजवीज केली आहे. त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार २० जूनपर्यंत त्यांच्या हातात पडणार आहे. त्यामुळे गेले काही महिने पगार मिळण्याची शाश्वती नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कर्जाचा डोंगर वर्षागणिक वाढतच असल्याने कामगारांचा पगार देण्यासाठीही बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. आतापर्यंत कर्ज काढून दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत बेस्ट कामगारांना पगार मिळत होते. मात्र कर्जाचा डोंगर वाढतच असल्याने पगाराची तारीख २० वर पोहोचली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळेल याची शाश्वतीच राहिलेली नाही. त्यात सतत कर्ज घेऊन बेस्टची आर्थिक पत कमी झाल्याने बँकांकडूनही कर्ज मिळणे कठीण झाले आहे.
बेस्टला वाचवण्यासाठी आराखडा तयार करणारे तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाल्याने हा विषय लांबणीवर पडल आहे. मात्र बेस्टने पैशांची जमवाजमव आधीच सुरू केल्याने कामगारांना २० जूनपर्यंत पगार मिळेल, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ म्हणाले.