मुंबई सलामत तो झेडपी पचास

By Admin | Published: January 18, 2017 07:00 AM2017-01-18T07:00:03+5:302017-01-18T07:00:03+5:30

दादरमधील ‘मातोश्री’ गडाच्या बुरुजावर उभारून ‘उद्धो’महाराज दुर्बिणीतून आसपासचा इलाका न्याहाळत होते.

Salary in Mumbai is ZP fifty | मुंबई सलामत तो झेडपी पचास

मुंबई सलामत तो झेडपी पचास

googlenewsNext

- सचिन जवळकोटे
दादरमधील ‘मातोश्री’ गडाच्या बुरुजावर उभारून ‘उद्धो’महाराज दुर्बिणीतून आसपासचा इलाका न्याहाळत होते. भिरभिरती नजर क्षणभर मंत्रालयावर थबकली. इथल्या इमारतीवर ‘भगवा’ फडकला होता, पण त्याचा ‘दंड’ नागपूरच्या शाखेतून आयात केला गेला होता. नि:श्वास सोडत महाराजांनी दुर्बीण बाजूला ठेवून टाळी वाजवली. तत्काळ पुढ्यात मिलिंद हजर जाहले.
महाराज : मिलिंदाऽऽ जरा पंतांना फोन लावून दे.
मिलिंद : (कुर्निसात करत) पण महाराज... आता ही मनोहरपंतांची वामकुक्षीची वेळ...
महाराज : (रागाने) खामोशऽऽ अजूनही कोणत्या जमान्यात वावरताहात तुम्ही? आता या पंतांची नव्हे, तर त्या पंतांची चलती... देवेंद्र पंतांना फोन लाव. काल मोदींवर टीका केलीय, आज पंतांशी संवाद साधू.
त्यानंतर, आपण किती मुत्सद्दीपणाचे राजकारण करतो, अशा अविर्भावात महाराज हसले. एवढ्यात ‘छोटे आदित्य युवराज’ गडावर प्रविष्ठ जाहले.
युवराज : महाराज.... प्रणाम. काल आम्ही थोडक्यात बचावलो. कार चालवताना बाका प्रसंग उभा ठाकला होता आम्हासमोर.
महाराज : (अस्वस्थ होत) ही नक्कीच विरोधकांची खेळी.
युवराज : (भाबडेपणाने) पण नेमके कोणते विरोधक? कारण आपले म्हणे कुणी मित्रच नाहीत. सारेच शत्रू. दादरच्या काकांपासून ते बारामतीच्या पुतण्यापर्यंत. कऱ्हाडच्या बाबांपासून वांद्र्याच्या शेलारमामापर्यंत... सारेच एकजात दुश्मन.
महाराज : (गर्वाने छाती पुढे करत) आमच्या धाकट्या बंधूंनाही आम्ही मागे टाकले फटकळ बोलण्यात. यालाच म्हणतात प्रत्येक ठिकाणी त्वेषाचे राजकारण!
युवराज : (नीट न ऐकू आल्यानं) काय म्हणालात महाराजऽऽ द्वेषाचे राजकारण?
मिलिंद : (लगेच खाकरत ) पंतांचा मोबाइल सतत एंगेज लागतोय महाराज. बहुधा ते सदाभाऊ, महादेवराव अन् रामदासभार्इंशी बोलत असावेत कॉन्फरन्सवर. आपल्याला वगळून महाराष्ट्रात कशी महाआघाडी करता येईल झेडपी इलेक्शनमध्ये... या विषयावर !
महाराज : (रागाने मुठ्या आवळत) हा सारा किरीट अन् आशिषचाच डाव. आमच्याजवळचा एकेक माणूस फोडताहेत सध्या.
युवराज : मग आपले शिवसैनिकही माहीर आहेत ना ‘फोडाफोडी’त. त्यांनाही कामाला लावू यात का आपण ?
महाराज : नको, नको. आजपावेतो आमचा अभिमन्यू झाला, तेवढा खूप झालाय. आता तुम्हाला ‘अर्जुन’च्या भूमिकेत युद्धात उतरायचेय. उचला ‘शिवधनुष्य’ अन् ताणा प्रत्यंचा.
युवराज : (गोंधळून) पण नेमकं कुणाला लक्ष्य करायचं महाराज ? समोर तर हात, घड्याळ, कमळ अन् इंजिन दिसतंय.
महाराज : (गालातल्या गालात हसत) आपण कुणाला टारगेट केलंय, हे कधीच कळू द्यायचं नसतं युवराज. मी जेव्हा मोदींवर टीका करतो, तेव्हा पंतांना जवळ करतो. पंतांशी फटकून वागतो, तेव्हा शेलारांशी तहाच्या वाटाघाटी सुरू करतो.
युवराज : (डोळे किलबिले करत) पण हे सारं आपण मुंबईतच बसून करतो... झेडपी प्रचाराचा कुठं विचार करतो?
महाराज : आधी आपली ‘राजधानी’ सांभाळली, तरच बाकीचं राज्य हातात. महापालिका सलामत तो झेडपी पचास. तेव्हा आपल्या दादरच्या वॉर्डावर जास्त लक्ष देऊ या. इथं आपली ‘शाखा’ टिकवायची असेल, तर दुसऱ्यांच्या ‘स्वप्ना’ला थारा नको. चला लागा कामाला. जय महाराष्ट्र !

Web Title: Salary in Mumbai is ZP fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.