आश्रमशाळांच्या शिक्षकांचे वेतन रखडले
By admin | Published: January 27, 2016 11:20 PM2016-01-27T23:20:48+5:302016-01-27T23:20:48+5:30
राज्यातील तब्बल ८२0 आश्रमशाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गत दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित.
अकोला : भावी नागरिक घडविण्याची जबाबदारी असलेल्या राज्यातील तब्बल ८२0 आश्रमशाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांवर गत दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यभरात ५२५ प्राथमिक व २९५ माध्यमिक आश्रम शाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांचे वेतन वेळेवर आणि नियमितपणे व्हावे यासाठी वित्त विभागाकडून सामाजिक न्याय विभागाला अनुदान देण्यात येते. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत या शाळांमधील शिक्षक व शिक्षकांचे वेतन नियमितपणे झाले; परंतु वित्त विभागाकडून अनुदान मंजूर न झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या शाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना वेतन मिळाले नाही. आता जानेवारी महिनाही संपत आला, तरी अद्यापही या शाळांवरील कर्मचार्यांची वेतनाची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. वेतन नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. मुलांच्या शाळा, शिकवणी वर्गाची फी, गृह व वाहन कर्जाचे हप्ते, आयुर्विमा पॉलिसीचे हप्त थकल्याने अतिरिक्त व्याजाचा भूर्दंड या कर्मचार्यांना सहन करावा लागणार आहे. दैनंदिन खर्च भागविण्याचाही प्रश्न उभा ठाकला आहे. वेतन रखडल्याने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्यांनी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडली; परंतु यावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आश्रमशाळा मुख्याध्यापक संघ राज्यभर आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहे.
पुरवणी अनुदान मिळेना
आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची वेतने अदा करता यावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाने शासनाकडे पुरवणी अनुदानाची मागणी केली आहे. शासनस्तरावरून ही मागणी मान्य झाली नसल्यामुळे आश्रमशाळांच्या कर्मचार्यांची वेतनाची प्रतीक्षा कायमच आहे.
अकोला जिल्हय़ातील शाळा
प्राथमिक शाळा - ११
माध्यमिक शाळा - ६
उच्च माध्यमिक शाळा- ४
--------------------
एकूण २१