निवडणूक निकालानंतर मद्य विक्रीला मुभा
By admin | Published: February 20, 2017 06:44 PM2017-02-20T18:44:17+5:302017-02-20T18:44:17+5:30
परवानाधारक व्यावसायिकांना महानगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर मद्य विक्री करण्यास मुभा
ऑनलाइन लोकमत
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी परवानाधारक व्यावसायिकांना महानगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर मद्य विक्री करण्यास मुभा दिली आहे.
२१ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेची निवडणूक असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजनी होणार आहे. परिणामी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून २०, २१ व २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यास सांगितले होते. याविरुद्ध महाराष्ट्र वाईन मर्चन्टस् असोसिएशनने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता परवानाधारक मद्य विक्रेत्यांना अंतरिम दिलासा देऊन शासनाला यावर ४ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
याचिकाकर्ते नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रांतर्गत व्यवसाय करतात. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे राज्यातील अन्य काही जिल्हाधिकाऱ्यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्री बंदीचे आदेश जारी केले असून बंदीच्या कालावधीत समानता नाही. बंदी लागू करताना सारासार विचार करण्यात आला नाही. मद्य विक्री व्यवसाय करण्यासाठी शासनाला मोठ्या रकमेचे शुल्क द्यावे लागते. त्यामुळे एक दिवसही व्यवसाय बंद ठेवल्यास व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागतो असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्याम देवानी व अॅड. कैलाश दोडानी यांनी काम पाहिले.