औरंगाबादच्या ‘युनायटेड स्पिरिट’ची मल्ल्यांकडून विक्री
By admin | Published: March 12, 2016 04:15 AM2016-03-12T04:15:54+5:302016-03-12T04:15:54+5:30
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘युनायटेड स्पिरिट’ या कंपनीची विजय मल्ल्या यांनी अमेरिकन कंपनी ‘डायगो’ला काही महिन्यांपूर्वी विक्री केली आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘युनायटेड स्पिरिट’ या कंपनीची विजय मल्ल्या यांनी अमेरिकन कंपनी ‘डायगो’ला काही महिन्यांपूर्वी विक्री केली आहे. ‘डायगो’ने आता कोकण अॅग्रोला ही कंपनी भाडेतत्त्वावर दिली आहे.
उपरोक्त व्यवहाराची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) नोंद नाही. मात्र, ‘युनायटेड स्पिरिट’च्या जागी ‘डायगो’ व ‘कोकण अॅग्रो’ यांच्या नावाने उत्पादन शुल्काचा भरणा होत आहे.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत मल्ल्या यांची ‘युनायटेड स्पिरिट’ ही कंपनी आहे. महाराष्ट्र डिस्टिलरीज लिमिटेड, शॉ वॉलेस डिस्टिलरीज लि., मॅक्डॉवेल अॅण्ड कंपनी लि. आणि त्यानंतर ‘युनायटेड स्पिरिट लि.’ असा या कंपनीचा प्रवास झाल्याची नोंद ‘एमआयडीसी’च्या रेकॉर्डमध्ये ९ जून २०१४ रोजी घेण्यात आली होती. मल्ल्या यांनी ‘डायगो’ला विक्री केल्याची नोंद मात्र दप्तरी नाही. स्थानिक बँकांची देणी चुकती
‘डायगो’ला विक्री होण्यापूर्वी युनायटेड स्पिरिटच्या नावावर औरंगाबादेतील काही बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाची मात्र त्यांनी परतफेड केली असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. ‘युनायटेड स्पिरिट’ने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून २५५ कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून १२८ कोटी रुपये, ‘सिकॉम’कडून
१५ कोटी रुपये, जनता सहकारी बँकेकडून २ कोटी रुपये, तर फेडरल बँकेकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जांची परतफेड केल्याच्या नोंदी ‘एमआयडीसी’कडे आहेत.