रेल्वेच्या बोगस तिकीटांची विक्री
By admin | Published: July 25, 2014 12:48 AM2014-07-25T00:48:35+5:302014-07-25T00:48:35+5:30
२.५ लाखांनी फसवणूक, खासगी तिकीट विक्री केंद्र सील
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील खासगी अतिरिक्त तिकीट विक्री केंद्रावरून होणार्या बनावट रेल्वे तिकीट विक्रीच्या गोरखधंद्याचा रेल्वे अधिकार्यांनी बुधवारी रात्री पर्दाफाश केला. या बनावट तिकीट विक्रीतून कंत्राटदाराने रेल्वेला जवळपास २.५ लाख रूपयांचा चुना लावला. तिकीट केंद्राच्या संचालकास बनावट तिकीटं विकताना अटक करण्यात आली असून, या केंद्रास सील ठोकण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्रीच्या खिडक्यांवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने २00५-0६ साली अकोला रेल्वे स्थानकाबाहेर कंत्राट पद्धतीने दोन अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. अकोल्यातील आकोटफैलमधील रहिवासी शाहबुद्दीन याने स्वत:च्या आणि नातेवाइकाच्या नावाने दोन निविदा भरून, हे कंत्राट मिळविले. २00६-0७ मध्ये रेल्वे स्थानकासमोरील एका हॉटेलच्या कॉर्नरवर सुरू करण्यात आलेल्या या जनता तिकीट बुकिंग काऊंटरमधून दररोज विकल्या जाणार्या तिकिटांची माहिती रेल्वेचे लेखा अधिकारी मुथा हे ठेवत. मध्यंतरी मुथा यांची बदली झाली. त्यानंतर जनता तिकीट विक्री काऊंटरवरून विकल्या जाणार्या तिकिटांच्या तपासणीमध्ये खंड पडला. याचाच फायदा घेत शाहबुद्दीन याने तिकीट काऊंटरला अतिरिक्त कमाई करण्याचे साधन बनविले. शाहबुद्दीनला रेल्वे प्रशासनाकडून मिळणार्या तिकिटांच्या रोलमधील प्रत्येक तिकिटावर नंबर टाकलेला असायचा; मात्र तिकीटांवर बनावट नंबर टाकून त्याची विक्री करणे त्याने सुरू केले. अकोला रेल्वे स्थानकावर लेखाधिकारी म्हणून अलिकडेच रुजू झालेले निळे यांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी पुराव्यासहित सर्व माहिती मुंबई येथे वाणिज्य प्रबंधकांना कळविली. त्यानंतर गत दोन दिवसांपासून शाहबुद्दीनच्या तिकीट काऊंटरवर मुंबईच्या मुख्य वाणिज्य प्रबंधकांच्या चमूने पाळत ठेवली. बुधवारी रात्री १0 वाजता त्याला बनावट तिकीट विकताना रंगेहाथ पकडून, शाहबुद्दीनला चालवावयास दिलेले तिकीट काऊंटर सील करण्यात आले. पुढील चौकशीसाठी शाहबुद्दीनला भुसावळ येथे नेण्यात आले आहे. या गोरखधंद्यातून शाहबुद्दीन याने रेल्वे प्रशासनाला जवळपास २.५ लाखांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.