बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री
By admin | Published: February 14, 2017 03:51 AM2017-02-14T03:51:40+5:302017-02-14T03:51:40+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री करणाऱ्या अंधेरीतील संदीप माखेचा यांच्यासह नऊ जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस
ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री करणाऱ्या अंधेरीतील संदीप माखेचा यांच्यासह नऊ जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशाने दाखल केले असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्याच्या रतनजी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टचे निखिल माखेचा यांच्या ट्रस्टची जमीन भार्इंदरपाडा भागात आहे. याच जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून घोडबंदर रोडवरील भार्इंदरपाड्यातील जुना सर्व्हे क्र. २६७, हिस्सा क्रमांक १, नवीन सर्व्हे क्रमांक ५५ आणि हिस्सा क्रमांक १ येथील जमीन संदीप माखेचा, सनम शेख, प्रमोद पाल, प्रमोद जाधव, अरविंद गुप्ता, राजकुमार सिंग, रासपाल मिश्रा आणि रत्नेश पाठक तसेच एफएम टच कंपनी अशा नऊ जणांनी विक्री केली. तसेच शासकीय यंत्रणेलाही याबाबतची खोटी माहिती दिली.
हा प्रकार आॅक्टोबर २०१५ ते १२ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान घडला. याप्रकरणी निखिल माखेचा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेची दखल घेऊन ठाणे न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाला दिले. त्यानुसार, याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. ढेमरे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)