बियाण्यांची वाढीव दराने विक्री!
By admin | Published: June 20, 2016 01:57 AM2016-06-20T01:57:32+5:302016-06-20T01:57:32+5:30
लोकमत स्टींग ऑपरेशनदरम्यान बियाण्यांची दरवाढ रद्द करण्याच्या ‘महाबीज’च्या आदेशाला बियाणे विक्रेत्यांद्वारे केराची टोपली दाखवली जात आहे.
अकोला : शेतकर्यांच्या रोषानंतर बियाण्यांची दरवाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) घेतला असला, तरीही अकोल्यात वाढीव दरानेच बियाण्यांची विक्री करण्यात येत आहे. 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मधून हे वास्तव उघडकीस आले असून आधीच दुष्काळाने पोळलेल्या शेतकर्याला महागड्या बियाण्यांच्या खरेदीची तोशिस सोसावी लागत आहे.
महाबीजच्या बियाण्यांमध्ये या वर्षी ३५ ते ४५ टक्के वाढ करण्यात आल्यानंतर शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 'महाबीज'ने गतवर्षीच्या दरातच बियाण्यांची विक्री करण्याचा निर्णय शनिवार घेतला. राज्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून तात्काळ करण्याचे आदेश महाबीज प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
गतवर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज'मार्फत तूर १३0 रुपये प्रतिकिलो, मूग १३५ रुपये प्रतिकिलो व उडीद बियाण्याची ११0 रुपये प्रतिकिलो या दराने बियाणे विक्री करण्यात आली होती. मात्र 'लोकमत' चमूने रविवारी शहरातील बियाणे बाजारात दरांची पाहणी केली, त्या वेळी महाबीजच्या तुरीचे दर १५0 ते १७0 रुपये प्रतिकिलो, उडिदाचे दर १६0 ते २00 रुपये प्रतिकिलो, तर मुगाचे दर २१0 रुपये प्रतिकिलो असल्याचे विविध बियाणे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
शेतक-यांना हेलपाटे
गतवर्षीच्या दरापेक्षा जास्त दराने ज्या शेतकर्यांनी तूर, मूग व उडीद बियाण्याची खरेदी केली आहे, अशा शेतकर्यांनी संबंधित कृषी अधिकार्यांकडे बियाणे खरेदीची पावती, टॅग व बँक खाते क्रमांक सादर केल्यास फरकाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे महाबीजच्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र पेरणी तोंडावर आली असताना कृषी अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना बिलं सादर करण्याची खटपट शेतकर्यांना करावी लागणार आहे.