साखर कारखाने विक्रीची चौकशी ‘ईडी’नेच करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:30 AM2017-10-04T04:30:53+5:302017-10-04T04:31:05+5:30
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री झाल्याच्या व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयनेच (ईडी) करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री झाल्याच्या व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयनेच (ईडी) करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनुसार या व्यवहारांची राज्य शासनाच्या राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीआयडी) चौकशी सुरू झाली असून त्यासाठी हा जबाब घेण्यात आला.
राज्यातील ३६ सहकारी साखर कारखान्यांची ९६० कोटी रुपयांना विक्री झाली असून बाजारभावाप्रमाणे या विक्रीपोटी १० हजार कोटी रुपये यायला हवेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची त्यांची तक्रार आहे. मागील पाच वर्षांत अडचणीत आलेले कारखाने विक्री करण्याचा जणू सपाटाच सुरू होता. ज्यांच्या गैरकारभार व भ्रष्टाचारामुळे हे कारखाने बंद पडले त्यांनीच स्वत:च्या खासगी संस्थेकडून किंवा कुणाला तरी पुढे करून हे कारखाने विकत घेतले आहेत. त्याबद्दल खासदार शेट्टी यांनी ईडी, उच्च न्यायालयात याचिका व मुख्यमंत्र्यांकडेही वारंवार तक्रारी केल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी ही चौकशी राज्य गुन्हे शाखेकडे सोपवली होती. या शाखेचे उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी शेट्टी यांचा कोल्हापुरात येऊन जबाब नोंदविला.
शेट्टी यांनी सांगितले, ‘हा सगळा व्यवहारच संशयास्पद आहे. ज्या बँकांनी कर्ज दिले व ते थकीत राहिले म्हणून कारखाने विक्रीस काढले त्यांची तसेच, ज्यांनी हे कारखाने विकत घेतले त्या संस्थेच्या संचालकांचीही चौकशी आवश्यक आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. जिल्हा बँका व सहकारी बँकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाºयांनी या व्यवहारात मोठा डल्ला मारला आहे. गोरगरीब शेतकºयांच्या घामाच्या पैशांतून कारखानदारी उभी राहिली.’