खारघरमधील भूखंडांची ४३९ कोटींना विक्री
By admin | Published: July 10, 2015 03:01 AM2015-07-10T03:01:13+5:302015-07-10T03:01:13+5:30
खारघर येथील सिडकोचे तीन भूखंड तब्बल ४३९ कोटींना विकले गेले आहेत. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत एकाच दिवसात ४३९ कोटींची भर पडली आहे
नवी मुंबई: खारघर येथील सिडकोचे तीन भूखंड तब्बल ४३९ कोटींना विकले गेले आहेत. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत एकाच दिवसात ४३९ कोटींची भर पडली आहे. त्यामुळे सिडकोकडून येत्या काळात भूखंड विक्रीवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिडकोने गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणाला बगल देत पुन्हा एकदा भूखंड विक्रीकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या महिन्यात नेरूळ येथील २२00 चौरस मीटरच्या भूखंडासाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सदर भूखंडाला प्रति चौरस मीटरला २ लाख ८५ हजार रुपयांचा दर मिळाला होता. या भूखंड विक्रीतून सिडकोला जवळपास ४५ कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे सिडकोने खारघर सेक्टर २३ येथील ८000 ते ९000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या तीन भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. आज त्या निविदा उघडण्यात आल्या. त्यानुसार भूखंड क्रमांक ३ ला प्रति चौरस मीटरला १,८४,१११ रुपये, भूखंड क्रमांक ४ला १,७१,५११ रुपयांचा दर प्राप्त झाला आहे, तर भूखंड क्रमांक ५ ला १,६१,१११ रुपयांचा दर मिळाला आहे.