स्मार्ट कार्डमध्ये फेरफार करून रेल्वेच्या दिड लाखांच्या तिकिटाची विक्री
By admin | Published: July 14, 2016 05:32 PM2016-07-14T17:32:58+5:302016-07-14T17:32:58+5:30
तिकिट खिडकीवरील रांगेतून प्रवाशांना मुक्ती मिळावी या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकावर बसविण्यात आलेल्या स्वंयचलित तिकिट मशिन ( आॅटोमेटीक तिकिट वेंडीग मशिन)च्या स्मार्ट कार्ड मध्ये
पुणे : तिकिट खिडकीवरील रांगेतून प्रवाशांना मुक्ती मिळावी या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकावर बसविण्यात आलेल्या स्वंयचलित तिकिट मशिन ( आॅटोमेटीक तिकिट वेंडीग मशिन)च्या स्मार्ट कार्ड मध्ये फेरफार करून एकाच दिवशी तब्बल 1 लाख 63 हजार रूपयांच्या तिकिटांची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी औरंगाबाद येथील 62 वर्षीय राधेशाम अग्रवाल या व्यक्तीस रेल्वे सुरक्षादलाने अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 22 स्मार्ट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. बुधवारी (दि.13) रोजी रात्री सापळा रचून या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्थानकांवरील तिकिट खिडक्यांवर मोठया प्रमाणात रांगा असल्याने लोकल तसेच पँसेंजर गाडयांचे तिकिट काढणा-या प्रवाशांना अनेकदा तासंतास रांगेत ताटकळत थांबावे लागते, तसेच अनेकदा या रांगेमुळे गाडीही सोडावी लागते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून या ठिकाणी स्वयंचलित तिकिट मशिन बसविण्यात आले आहे. या मशिन मध्ये कॉईन तसेच रोख रक्कम टाकूनही तिकिट काढता येते. तसेच रेल्वे कडून रिचार्ज करून देण्यात येणारे स्मार्ट कार्ड वापरूनही या मशिन मधून तिकिट काढता येते. अगरवाल यांनी रेल्वेचे हे स्मार्ट कार्ड घेतलेले असून त्यावर तिकिट काढण्याची मर्यादा एक हजार रूपयांपर्यंत आहे. त्यापेक्षा जास्त तिकिट त्यांना काढता येत नाहीत. मात्र, अगरवाल यांनी आपल्या कार्डामध्ये फेरफार करून 3 जुलै रोजी लाखो रूपयांच्या तिकिटांची विक्री स्थानकारवर केली आहे. या मशिन मधून दरदिवशी सरासरी 20 ते 22 हजार रूपयांची तिकिटे काढली जातात. मतर, त्या दिवशी एकदम तब्बल 1 लाख 63 हजार रूपयांची तिकिटे काढल्याचे आढळून आले. एकदम या तिकिट विक्रीचा संशय आल्याने पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक गौरव झा आणि मदनलाल मिनल यांनी काही कर्मचा-यां़च्या मदतीने या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यात काल रात्री अग्रवाल हा तिकिट विक्री करतानाच आढळून आला. त्यानंतर तत्काळ या आरोपीस रेल्वे सुरक्षादलाच्या ताब्यात देण्यात आले.
मिरजमध्ये बोगस टीटीईला अटक
अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी मिरज रेल्वे स्थानकावर बनावट तिकिट तपासणीस पुणे विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून पकडले आहे. ओमप्रकाश गुप्ता ( वय 62 वर्षे )रा. लखनऊ असे या आरोपीचे नाव असून रेल्वे मध्ये तिकिट नसलेल्या प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचे प्रकार हा आरोपी गेल्या काही महिन्यांपासून करत होता.