सलील कुलकर्णी लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत रसिकांसमोर येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 10:07 PM2018-09-10T22:07:01+5:302018-09-10T22:11:20+5:30
गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले असून वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाद्वारे ते लेखक- दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहेत.
पुणे : गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. साचेबद्ध चौकटींना छेद देत सातत्याने निरनिराळ्या गोष्टी करण्याचा ध्यास घेतलेले सृजनशील आणि प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले असून,वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाद्वारे ते लेखक- दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहेत.
लोकप्रिय परीक्षक, संगीत गुरु ,त्याचप्रमाणे मधली सुट्टीसारख्या कार्यक्रमाचे संकल्पनाकार तसेच लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी याद्वारे लेखक अशा अनेक त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आयुष्यावर बोलू काही चा १५०० हून अधिक कार्यक्रमांचा विक्रम तसेच ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर मैत्र जीवांचे हा जगभरात सादर झालेला कार्यक्रम ही त्यांच्या प्रतिभेला मिळालेली एक विशेष दाद आहे. याच रसिकांच्या प्रेम आणि आशीर्वादावरच ते आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अभिनव पाऊल टाकत आहेत. या नव्या भूमिकेविषयी लोकमतशी बोलताना प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी म्हणाले, गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे काही केले ते नक्कीच वेगळे केले.अगदी बालगीतांपासून,अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्वच गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखी एक नवी वाट चोखाळत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये म्युझिक व्हिडिओ चे दिग्दर्शन केले असल्यामुळे कॅमेरा,एडिटिंग, ट्रॉलीचा वापर याची थोडीफार जाण होतीच पण चित्रपटाचे दिग्दर्शन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्या फॉर्मचा अभ्यास केला. आपल्या आसपास घडणा-या गोष्टी आणि असलेली पात्र अशी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटामधून मी मांडत आहे. लेखनही अशाच पद्धतीने केले आहे की सगळ्यांना ती स्वत:ची गोष्ट वाटेल आणि प्रत्येक जण त्याच्याशी रिलेट होईल. ही कथा ज्यांना ज्यांना ऐकवली त्यांच्या ती पसंतीस उतरली आणि त्यांनी ह्यहिरवा कंदिलह्ण दिला. या गोष्टीत तू हयूमर मांडला आहेस, ती जर दुस-या कुणा दिग्दर्शकाच्या हातात दिलीस तर ती लाऊड होईल असा सल्ला अनेकजणांनी दिल्यामुळे स्वत:च या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. पु.ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीला मी आदर्श मानतो. रसिकांच्या चेह-यावर स्मित हास्य यावे अशा विनोदी ढंगामधून चित्रपटाची मांडणी करण्यात येणार आहे. पात्रांची निवडही झाली असून येत्या आॅक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रत्यक्ष सुरूवात होईल असे त्यांनी सांगितले.