सलमान खानचा जामीन रद्द करा - भाजपा
By admin | Published: July 26, 2015 07:41 PM2015-07-26T19:41:32+5:302015-07-26T20:12:11+5:30
याकूब मेमनच्या फाशीला विरोध दर्शवणा-या सलमान खानचा जामीन रद्द करा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - याकूब मेमनच्या फाशीला विरोध दर्शवणा-या सलमान खानचा जामीन रद्द करा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. सामूहिक हत्याकांड घडवणा-या गुन्हेगाराचे समर्थन करत सलमानने गुन्ह्याचेच समर्थन केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
याकूब मेमनला फाशी देण्याऐवजी त्याचा भाऊ टायगर मेमनला फाशी द्यावी अशी मागणी अभिनेता सलमान खानने केली होती. एका निर्दोषाला फाशी देणे म्हणजे माणूसकीची हत्या असल्याचे त्याने म्हटले होते. सलमानच्या या वादग्रस्त विधानावर राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन देत सलमानचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली. सलमानने याकूबचे समर्थन करणे हे दुर्दैवी आहे, गुन्ह्याचे समर्थन केल्याच्या कारणावरुन त्याचा जामीन रद्द करावा असे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. अखेरीस पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.