सलमान खानची ऑनस्क्रीन माँ रिमा लागू यांचं निधन
By Admin | Published: May 18, 2017 08:51 AM2017-05-18T08:51:32+5:302017-05-18T11:13:00+5:30
बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि पडद्यावरील प्रेमळ आईची भूमिका साकारणा-या रिमा लागू यांचं निधन झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि पडद्यावरील प्रेमळ आईची भूमिका साकारणा-या रिमा लागू यांचं निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झाले. रात्री उशीरा 3.15 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 59 वर्षांच्या होत्या.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रिमा लागू यांनी हिंदी सिनेमांव्यतिरिक्त मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये तिनं दबंग सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे. यामुळे त्यांना ऑनस्क्रीनवरील सलमान खानची आईची असेही म्हटले जायचे.
सलमान खानच्या करिअरमध्ये रिमा लागू यांचंही महत्त्वपूर्ण योगदान आहे. सलमानच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये रिमा यांनी त्याच्या प्रेमळ आईची भूमिका साकारली. यामुळे सलमान खान रिमा यांना ""माँ"" म्हणूनच संबोधित करू लागला.
दरम्यान, सलमान आणि रिमा यांच्या वयामध्ये फारसे अंतर नव्हते. मात्र त्यांच्या चेह-यावरील ममतेचे भाव व स्नेहामुळे रिमा ""रिल लाईफ""मधील सलमानची ""माँ"" बनल्या. योगायोग म्हणजे ज्या सिनेमामध्ये रिमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली त्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
पहिला सिनेमा ""मैंने प्यार किया"" जो बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर ""पत्थर के फूल"", ""साजन"", ""हम साथ साथ है"" आणि ""जुडवा"" हे सर्व सिनेमे बॉक्सऑफिसवर हिट ठरले आहेत. ""हम आपक है कोन"" या सिनेमामध्ये मात्र रिमा सलमान खानची हिरोईन माधुरी दीक्षितच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या.
""मैंने प्यार किया"" आणि ""हम आपक है कोन"" या सिनेमांमसाठी रिमा यांना 1990 साली फिल्म फेअरच्या ""बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस"" अवॉर्डनं गौरवण्यात आले होते. शिवाय आशिकी आणि वास्तव या सिनेमांमधील भूमिकांसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
1970 च्या अखेरीस आणि 1980 च्या सुरुवातीस त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. विवेक लागू यांच्यासोबत त्यांनी विवाह केला मात्र काही वर्षांनंतर दोघंही स्वतंत्र झाले.
""मैंने प्यार किया""मधील रिमा लागू
एका कार्यक्रमादरम्यान रिमा लागू आणि सलमान खान यांची झालेली भेट
छोट्या पडद्यावरील सासू-सुनेमधील भांडण दाखवणारी "तू तू मैं मैं" या विनोदी मालिकेलाही प्रेक्षकांसाठी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेत रिमा यांनी सासू भूमिका निभावली होती.