Lockdown: पहिल्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी सलून बंद; अनेक चालक संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:14 AM2020-06-29T02:14:38+5:302020-06-29T07:01:25+5:30
किटचा खर्च न परवडल्याने सलून चालकांचा निर्णय
मुंबई : राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत आजपासून काही अटी-शर्तींसह सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. किटचा खर्च जास्त, दाढीविरोधात नाराजी यामुळे पहिल्या दिवशीच राज्यातील अनेक ठिकाणी सलून बंद होती, असे महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले.
याबाबत काशिद म्हणाले की, अॅप्रन, पीपीई किट वापरून केवळ युनिसेक्स सलून सुरू झाली आहेत. पीपीई किट आणि इतर साहित्याचा खर्च जास्त आहे. आधीच तीन महिने काम नसल्याने सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सलून बंद होती. तर सरकारने केवळ केशकर्तन करण्यास परवानगी दिली आहे. खर्च वाढला आहे, पण केशकर्तनलाच परवानगी तर दाढीला परवानगी नाही. अशा अनेक अटी-शर्तींमुळे सलून चालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई-ठाणे परिसरात १५ ते २० टक्के सलून सुरू
मुंबई-ठाणे परिसरात अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. काही ठिकाणी सम-विषम नियम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश सलून बंद होते. तसेच अनेक सलूनचालक हे गावी गेले असून ते आॅगस्टपर्यंत येणार नाहीत. त्यामुळे आज केवळ १५ ते २० टक्के सलून सुरू होते, असे मुंबई सलून अॅण्ड ब्यूटीपार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. आज सलून सुरू झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी चालक कशाप्रकारे काळजी घेतात हे पाहिले.