विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

By admin | Published: November 5, 2016 12:49 AM2016-11-05T00:49:53+5:302016-11-05T00:49:53+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विक्रीकर निरीक्षका (एसटीआय)च्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Salt on student wounds | विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

Next


पुणे : विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यभर केलेल्या आंदोलनानंतर गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विक्रीकर निरीक्षका (एसटीआय)च्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या पदाच्या सुमारे तीन हजार जागा रिक्त असताना केवळ १८१ पदांवर भरतीचा निर्णय घेऊन शासनाने जखमेवर मीठ चोळल्याची भावना परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि एसटीआय या पदांच्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत. मात्र, शासनाकडून दोन वर्षांपासून भरती प्रक्रियेकडे काणाडोळा केला जात आहे. दोन वर्षांपासून पीएसआय तर वर्षभरापासून एसटीआयची भरती झालेली नाही. तसेच, इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविल्यास पदे खूप कमी असतात. याच्याविरोधात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. पुण्यात या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या आंदोलनानंतर ‘लोकमत’ने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची स्थिती तसेच पदभरतीवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर आयोगाकडून एसटीआयची पहिली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने १८१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, राज्यात एसटीआयची सुमारे तीन हजार रिक्त पदे आहेत. तर, राज्यभरात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. असे असताना केवळ १८१ पदे भरणे योग्य नाही. ही परीक्षा सुमारे चार लाख विद्यार्थी देतील. मागील वर्षीही केवळ ४२ पदांसाठीच जाहिरात देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठीच जाहिरात देण्यात आली असून, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एकूणच आणखी किती प्रतीक्षा करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Salt on student wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.