साळवाडीचा नादुरुस्त पूल अखेर कोसळला
By Admin | Published: September 21, 2016 01:34 AM2016-09-21T01:34:36+5:302016-09-21T01:34:36+5:30
बोरी बुद्रुक व साळवाडी गावांना जोडणारा पूल निकृष्ट कामामुळे मंगळवारी कोसळला.
राजुरी : बोरी बुद्रुक व साळवाडी गावांना जोडणारा पूल निकृष्ट कामामुळे मंगळवारी कोसळला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. या भागातील जवळपास १० गावांना जोडणाऱ्या कुकडी नदीवरील या पुलाचे काम जवळपास २५ वर्षांपूर्वी झालेले होते. ठकेदाराने निकृष्ट काम केले होते. नदीला पूर आल्याने काही दिवसांतच पाया खचल्याने पूल धोकादायक झाला होता. सातत्याने खचणाऱ्या पुलाचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. मात्र, पाटबंधारे खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीबाबत कुठलीच हालचाल न केल्याने हा पूल कोसळला.
आॅगस्ट महिन्याच्या १० तारखेला हा पूल पहाटे खचून पुलाला मोठी भेग पडली होती. तेव्हपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा खचलेल्या पुलाचे दोन तुकडे होऊन स्लॅब कोसळला. दुरवस्थेमुळे भविष्यात पुलाला धोका असल्यामुळे दुरुस्तीबाबत लोकमतने दोन वर्षांपासून वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. फेब्रुवारीच्या १५ तारखेलाही पूल कोसळण्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करून पुलाची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे पत्र दोन्ही गावांतील सरपंच पुष्पा कोरडे तसेच कैलास काळे व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोर व सुनील जाधव यांनी केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने हा पूल सोसळला.
>पूल कोसळल्यामुळे नागरिकांना सुमारे २५ किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे. पुलाच्या कामासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असूनही काम आता तरी त्वरित सुरू करण्यात यावे; अन्यथा उपोषण करण्यात इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेद्र भोर व सुनील जाधव यांनी दिला आहे.
पुलाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. त्यांनी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीबाबत आश्वासन दिले होते. दुरुस्तीसाठी येथील वाहतूकही बंद करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नव्हते.
पाहणीनंतर तब्बल ४० दिवसांनी ही घटना घडली. हा पूल तेव्हापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे दोन्ही गावांच्या बाजूला असणाऱ्या दहा ते बारा गावांना याचा फटका बसला असून पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे.