वीर बाजीप्रभूंची समाधी शिवपे्रमींच्या नजरेआड
By Admin | Published: July 12, 2017 12:42 AM2017-07-12T00:42:04+5:302017-07-12T00:42:04+5:30
वीर बाजीप्रभूंची समाधी शिवपे्रमींच्या नजरेआड
आर. एस. लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबा : तोफांची इशारत झाली अन् घायाळ बाजीप्रभूंनी घोडखिंडीत प्राण सोडले... बांदल मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड झाली... विशाळगडावरील धारकऱ्यांनी बाजी व फुलाजी देशपांडे या दोघा बंधंूचे मृतदेह गडावर नेले. शिवरायांनी स्वत: पाताळदरी येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. आजही तेथे देशपांडे बंधंूची घडीव दगडी बांधकामातील समाधी ऊन, वारा, सोसत उजाड माळावर गेली ३५७ वर्षे जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत शिवभक्तांच्या वाटेकडे डोळे लावून आहे.
गेल्या चार वर्षांत गड व पायथा जोडणारा पूल, गडावरील पायरी रस्ता, मुंढा दरवाजाची उभारणी झाली. गडाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे; पण ज्यांनी स्वराज्याला तारले व जे विशाळगडच्या प्रेरणेचा स्त्रोत आहे, त्या
देशपांडे बंधंूच्या समाधीकडे शासन
व शिवप्रेमींची डोळेझाक झाली
आहे.
समाधीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. भंगवंतेश्वर ते समाधी स्थळ या दरम्यानचा फरस बंदीचा रस्ता काळाच्या ओघात गायब झाला आहे. प्लास्टिक, कोंबडीची पिसे या अस्वच्छता व दुर्गंधीने समाधीकडे जाणाऱ्या वाटेची नाकेबंदी केली आहे. गडावर येणारा बहुतेक पर्यटक गैरसोयींमुळे या समाधीकडे फिरकत नाहीत. समाधीच्या वाटेवरची अस्वच्छता पाहून शिवभक्त मैलावरूनच समाधीचे मुखदर्शन घेतो. समाधी स्थळाजवळ बारमाही पाण्याची छोटी विहीर शिवकालीन पाण्याचा स्त्रोत आहे; पण आज ही विहीर दगड, बाटल्यांनी बुजविली आहे.
बाजींच्या समाधीवर मेघडंबरी उभारून समाधी बंदिस्त बांधकामाने सुरक्षित ठेवण्याची गरज येथील शिवाजी तरुण मंडळाचे प्रमुख बंडू भोसले यांनी व्यक्त केली. सुलभ रस्ते, पाणी सुविधा, बगीचा, वृक्षारोपण, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा, दिशादर्शक फलक, कचराकुंडी, बैठक व्यवस्था उभारून येथे सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. कोंबडे कापून पार्टीची मजा लुटणारी मानसिकता बदलताना गडाचा शिवकालीन इतिहास चिरंतन ठेवणारे हे स्मारक होण्याची गरज आहे.
राजस्थानातील काही गडांवर शासकीय व सेवाभावी संस्थांमार्फत स्वच्छता राखून तेथील ऐतिहासिक पावित्र्य जपले जाते. त्या पद्धतीने या गडावरही इतिहासाचा बाज राखणारी यंत्रणा उभारावी लागेल. हजारो तरुणांचे जथ्थे जुलैमध्ये पन्हाळा ते विशाळगड या शिवकालीन मार्गावर साहसी मोहिमेसाठी येतात; पण बहुतेक मोहिमा पावनखिंडीतच अर्धविराम घेतात. पावनखिंड ते विशाळगड ही पुढील सुमारे बारा किलोमीटरची मोहीम होत नसल्याने बाजींच्या समाधीस्थळापर्यंत शिवप्रेमींना जाता येत नाही. साहजिकच गडावरील इतिहास व बाजींच्या समाधीचे दर्शन शिवभक्तांपासून दुर्लक्षितच राहते. पावनखिंडीतील बाजींच्या स्मारकापर्यंत शिवप्रेमींसह शासकीय यंत्रणाही धावते; पण गडावरील बाजींच्या समाधीकडे कोणीही फिरकताना दिसत नाही. ही खंत विशाळगडवासीयांनी व्यक्त केली.
गड-किल्ले पार्टीचे अड्डे...
सह्याद्रीच्या माथ्यावरील स्वराज्याचे हे जिवंत साक्षीदार आज हौशी मंडळीच्या पार्टीचे अड्डे बनले आहेत. काही मंडळी सेल्फीच्या नादात तेथील पावित्र्य विसरत आहेत. गड हे गौरवशाली पराक्रमांची वारसास्थळे बनविणारी दिशा मोहिमेच्या केंद्रस्थानी असावी. साहसी पर्यटन म्हणून या मोहिमा न होता इतिहास जपणारा प्रवाह उभा करणारी शक्ती यातून उभी करावी लागेल.