अहमदनगरच्या कुलकर्णी बंधूंचा समतेचा,स्त्री दाक्षिण्याचा पाडवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 10:25 PM2017-10-20T22:25:20+5:302017-10-20T22:25:28+5:30
दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो.
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो. भाऊबीजेचा अपवाद. पण नगरच्या भूतकरवाडीतील कुलकर्णी बंधुनी मात्र रूढी, परंपरेला छेद देत दिवाळी पाडव्याला परिवर्तनाची गुढी उभारली आहे. यादिवशी कुलकरण्यांच्या घरातील महिलांना पूर्ण विश्रांंती देत घरातील सर्व कामे पुरुष करतात.
मंगला रघुनाथ कुलकर्णी या पंचाहत्तरीतील आजीबाई या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांची चार मुले सूर्यकांत व सर्वात धाकटा उमेश हे दोघे पुण्यात, दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रशेखर पैठण (औरंगाबाद) येथे वकील. तिसरे नंदकिशोर नगरच्या इंडियन सिमलेस कंपनीतून निवृत्त झालेले. उमेश यांनी दिवाळी पाडव्याला घरातील महिलांना पूर्णपणे विश्रांती देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी होकार दिला, अन कुलकर्णी परिवारात अनोखा दिवाळी पाडवा सुरू झाला. २०१३ पासून समतेची गुढी उभारून परिवर्तनवादी समतेची दिवाळी सुरु झाली.
पाडव्याच्या दिवशी या परिवारात स्त्रियांचा कामाचा भार पुरुषच वाहतात. शुक्रवारी चारही भावांनी सकाळी आईची सुगंधी तेलाने मालिश करून तिला ओवाळले. नंतर प्रत्येकाने आपल्या पत्नीची सुगंधी तेलाने मालिश करून त्यांना ओवाळले. ओवाळणी म्हणून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावर्षी या घरात स्वावलंबनाची संकल्पना राबविली जात आहे. त्यानुसार घरातील प्रत्येक पुरुषाने आंघोळीनंतर आपापले कपडे धुवून टाकले. महिलांच्या फर्माईशीनुसार संध्याकाळी पुरुषांनीच पावभाजी तयार करून घरातील महिलांना ती खाऊ घातली. दिवाळीचा फराळसुद्धा पुरुषच बनवतात.
पुणेकर उमेशने यावर्षीचा फराळ बनविला. यंदा चिठ्ठी काढून सकाळचा चहा नष्ट कोणी बनवायचा हे ठरलं. त्यानुसार गुरुवारी वकील चंद्रशेखर यांनी तर शुक्रवारी उमेश यांनी चहा नष्टा बनविला. भांडीसुद्धा या भावांनीच घासली, धुतली. नेहमी घरात स्त्रियाच राबत असतात, त्यामुळे आम्ही घरातील स्त्रियांवरील अन्याय नाही म्हणता येणार, त्यांच्यावरील भार कमी व्हावा म्हणून हि आगळी दिवाळी सुरु केली. मी पैठणला राहतो. त्यामुळे नाथांच्या घरची उलटी खुण म्हणतो तसे पाडवा हा पुरुषांच्या गौरवाचा, नाही तर स्त्रियांच्या गौरवाचा पाडवा सुरु केला. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना आम्ही राबवतो. गेल्यावर्षी आजची तरुणाई व त्यांच्या अपेक्षा या विषयावर घरातील पुतण्यांसाठी परिसंवाद ठेवला होता. त्याच्या आदल्या वर्षी कविता लेखन व कविता वाचन ठेवले होते.
-चंद्रशेखर व उमेश कुलकर्णी, अहमदनगर.