'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:31 IST2024-12-07T12:22:35+5:302024-12-07T12:31:02+5:30
ठाकरे गटाकडून बाबरी विध्वसांचे समर्थन केल्यावरुन समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे.

'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..."
Rais Shaikh on Milind Narvekar post : विधासभना निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या यांच्या शिवसेना पक्षानेही सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी उद्धध ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरु केली असून शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. मात्र या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून बाबरी विध्वसांचे समर्थन केल्यावरुन समाजवादी पक्षाने आक्षेप घेत निषेध व्यक्त केला आहे. अशाप्रकारे गौरवीकरण अयोग्य असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे. बई महापालिका निवडणूक कधीही लागू शकते त्यामुळे आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला आहे. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा, अशा सूचना ठाकरेंनी दिल्या आहेत.
अशातच बाबरी मशिद विध्वंसाला ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवर एक पोस्टर शेअर केले होते. हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे! वंदनीय शिवसेनाप्रमुख, असं या पोस्टरवर लिहीण्यात आलं होतं. यासोबत त्यावर बाबरी मशिद विध्वंसाचा आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. मात्र आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देत निषेध नोंदवला आहे. या गोष्टी अनावश्यक असल्याचे रईस शेख यांनी म्हटलं आहे. "आपल्याला आठवण करून देतो की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मागील दोन निवडणुकांमध्ये – लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो," असं शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.