भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 08:49 AM2024-04-21T08:49:05+5:302024-04-21T08:50:46+5:30
Rais Shaikh : शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता.
भिवंडी : राजीनाम्यानंतर काही तासांतच समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) भिवंडी पूर्व विधानसभा (Bhiwandi East) आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांची घरवापसी झाली आहे. आमदार रईस शेख यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. भिवंडीच्या लोकांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेत असल्याचे रईस शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात मोठी खळबळ पाहायला मिळाली.
भिवंडी शहरात समाजवादी पार्टीमध्ये दलालांचे राज्य प्रस्थापित झाल्याचे सांगत त्या विरोधात बंड पुकारत रईस शेख यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. या राजीनामा नाट्यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, रईस शेख समर्थकांनी सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रईस शेख यांचा राजीनामा हा महाविकास आघाडीसाठी भिवंडीत एक झटका मनाला जात होता. या राजीनामा दिल्यानंतर रईस शेख लवकरच अजित पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण, रईस शेख यांनी राजीनामा मागे घेतला आहे. भिवंडीत लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील निवडणूक लढवत आहेत.