याकूब मेमन प्रमाणेच एकबोटे आणि भिडेंवर गुन्हे दाखल करा- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 02:37 PM2018-01-03T14:37:55+5:302018-01-03T14:39:27+5:30
भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली
मुंबई- भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता, पण त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली. तसाच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे. त्यांचं कृत्यही दहशतवादाप्रमाणेच आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. बुधवारी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आजच्या बंदमध्ये इच्छेने सहभागी व्हा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आंदोलकांनी संयम ठेवा, जबरदस्ती नको, शांततेने बंद पाळला जावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना केलं.
आपल्या देशात प्रत्येकाला कोणता देव किंवा धर्म मानायाचा याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, सध्या काही लोक त्यांचा देव किंवा धर्म दुसऱ्यांवर लादू पाहत आहेत. भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्यानिमित्ताने त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच आम्ही ही सक्ती झुगारत आहोत, हे दाखवून देण्यासाठी आजचा संघटित बंद पुकारण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी दलित समाजाचा न्यायाधीश नेमू नये. तसं केल्यास ते सवर्णांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल. शासनाला याबाबत निर्णय घेता येत नसल्यास त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यांना नाव सुचवू, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचं स्वागत आहे. पण या चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी दलित न्यायाधीश नको. त्यामुळे सवर्णांवर अन्यायाची भावना होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.