"समाजात दुही माजवणाऱ्या..."; संभाजी भिडेंच्या विधानानंतर जयंत पाटलांचे आक्रमक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 08:29 PM2023-07-29T20:29:14+5:302023-07-29T20:29:38+5:30
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेल्या विधानावरून सुरू आहे वाद
Sambhaji Bhide, Mahatma Gandhi father Contorversy शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे अनेक वेळा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतात. कधी महिलांच्या टिकलीवरुन, तर कधी मूल जन्मावरुन तर कधी कोरोनावरुन... त्यांच्या विधानांमुळे वाद होतातच. सध्या भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार व त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिंडे यांनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला. त्यावरून वाद पेटला असतानाच, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी ट्विटमधून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.
"मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य असे आहे. केवळ भारतच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी," असे आक्रमक ट्विट करत त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
दरम्यान, संभाजी भिडेंची या विधानाआधी चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. नियोजित बैठकस्थळी आंबेडकरवादी संघटनांनी आणि काहींनी विरोध केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत या विरोधकांना ताब्यात घेतल्याने वाद टळला. त्यानंतर, संभाजी भिडे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी, संघटनात्मक कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी महात्मा गांधींजींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे हा वाद विधिमंडळापासून ते राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चिला जात आहे.