कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या चौकशीची शक्यता, पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 02:33 PM2018-03-22T14:33:27+5:302018-03-22T14:33:27+5:30
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सांगली - कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. भिडे गुरुजी यांची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद 3 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले होते. दरम्यान, या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मिलिंद एकबोटे याला अटक करण्यात आली आहे. तर संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे व त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाले. पथकाने पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागात दिवसभर तळ ठोकून शिवप्रतिष्ठान या संघटनेबद्दल चौकशी करुन माहिती घेतली. पण सायंकाळपर्यंत शिवप्रतिष्ठानच्या एकाही कार्यकर्त्याला चौकशीसाठी बोलाविण्यात आले नव्हते.
अडीच महिन्यापूर्वी कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली होती. या दंगलीत एका तरुणाचा बळी गेला. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दंगलीच्या निषेधार्थ महाराष्टÑ बंद पुकारला होता. या बंदला सांगलीसह अनेक राज्यांतील अनेक जिल्ह्यात हिंसक वळण लागले होते. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे, मिलिंद एकबोटेसह तिघांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या आठवड्यात एकबोटेंना अटक झाली आहे. भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्चला मुंबईत विधानभवनवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे, तर दोन दिवसापूर्वी भिडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन, दंगलीला आंबेडकर जबाबदार असून, त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवप्रतिष्ठानने २८ मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून पुणे पोलीस तपासासाठी एकदाही सांगलीत आले नाहीत. तसेच साधी चौकशीही केली नाही. घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यानंतर पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले. एलसीबीमध्ये हे पथक तळ ठोकून आहे. पथकाने दिवसभरात स्थानिक अधिकारी व कर्मचाºयांकडून शिवप्रतिष्ठान या संघटनेबद्दल माहिती घेतली. कोरेगाव-भीमा दंगल होण्यापूर्वी व दंगलीनंतर भिडे कुठे होते, याची गुप्त माहितीही पथकाने घेतली. २८ मार्चला निघणाºया मोर्चाविषयीही पथकाने माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत पथक थांबून होते. परंतु शिवप्रतिष्ठानच्या एकाही कार्यकर्त्याला चौकशीसाठी बोलाविले नाही. पथकातील अधिकाºयांची भेट घेतली, मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
भिडे शिराळ्यात
पुणे पोलीस तपासासाठी सांगलीत दाखल झाले, त्यावेळी भिडे जिल्हा दौºयावर होते. २८ मार्चच्या मोर्चाचे नियोजन व रायगड येथे ३२ मण सोन्याचे सिंहासन बसविण्याबाबत त्यांनी शिराळा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. सोशल मीडियावरुन पुणे पोलीस आल्याचे वृत्त पसरताच अनेक कार्यकर्ते एकमेकांशी संपर्क साधून माहिती घेत होते.
पुणे पोलिसांचे पथक सांगलीत आल्याचे प्रसारमाध्यमातून समजले. भिडेंसह आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी चौकशीसाठी बोलाविले नाही. स्थानिक पोलिसांनीही आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. पथक येणार असल्याची दोन दिवसापासून चर्चा सुरु होती.
- नितीन चौगुले, कार्यवाह, शिवप्रतिष्ठान, सांगली.