राष्ट्रीयतेबाबत हिंदू स्त्री-पुरुष नपुंसक : संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 10:55 AM2018-05-29T10:55:03+5:302018-05-29T10:55:03+5:30
हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही, असं भिडे यांनी म्हटलं
जळगाव: हिंदू स्त्री-पुरुष राष्ट्रीयतेबाबत नपुंसक असल्याचं विधान शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलंय. चीन आणि पाकिस्तान हे भारताचे नंबर एकचे शत्रू आहेत, त्यांच्याविरोधात हिंदूंनी एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे. मात्र हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही, असंही ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
'देशातील हिंदू स्त्री-पुरूष राष्ट्रीयत्वाच्या कसोटीवर अनुत्तीर्ण आहेत. आपली धरती, परंपरा, संस्कृती, भाषा, धर्म याबाबत टोकाची क्रियाशिलता हिंदूंच्या रक्तात आढळत नाही. हिंदूना स्वार्थापलीकडे काही कळत नाही. ही उणीव दूर केल्याशिवाय आपण राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही,' अशी घणाघाती टीका संभाजी भिडे यांनी केली. ‘३२ मण सिंहासन व खडा पहारा’ या विषयावर भिडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं.
भारत हा जगातील सर्वात संपन्न देश आहे. जपान, चीन, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, तुर्कस्थान, नेपाळ, इराण, इराक, अफगाणिस्तान, अरबस्थान हा सर्व भाग भारतखंडाचा भाग होता. त्यातील बराच भाग गळाला. तरीही भारत जगात लक्षावधी एकर सुपीक जमीन असलेला, मोठ्या संख्येने नद्या असलेला, पशुधन, जलसंपदा असलेला तसेच बुद्धीसंपन्न लोकांचा असा एकमेव देश आहे. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला आहे. मात्र आपणच करंटे आहोत. मातृभूमीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव आपल्याला नाही. आपल्याला परदेशाचं आकर्षण वाटतं. मात्र ‘नासा’सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेच्या ११ जणांच्या संचालक मंडळात १० भारतीय हिंदू आहेत. जिनीव्हातील सर्वोच्च ताकद असलेल्या अणुभट्टीचं संचालन करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये ५३ टक्के हिंदू भारतीय आहेत. संगणक क्षेत्रातील ३७ टक्के शास्त्रज्ञ भारतीय आहेत. मात्र बंगालच्या उपसागरातून (गंगासागर) युरेनियम, थोरीयम असलेल्या भागातून वाळू उपसण्याचा करार अमेरिकेशी केला. १८६२ ते १९८२ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून हे दुर्मिळ मूलद्रव्य नेलं आणि आता आपण त्यांच्याकडे युरेनियम, थोरियमची भिक मागतो, असं भिडे म्हणाले.
जगातील १८७ राष्ट्रांमध्ये आपलं व्यवहारस्थान काय? शेकडो हजारो वर्ष परकीयांच्या आक्रमणात असलेला देश. ७६ राष्ट्रांनी आक्रमण केलं, असा भारत हा जगातील एकमेव देश आहे. असं का झालं? कारण हिंदूंच्या रक्तात आपण कोण आहोत? कशासाठी जगायचं? कशासाठी मरायचं? आपला शत्रू कोण? आपला मित्र कोण? याची जाणीवच नाही. असेल तरी स्वार्थापलिकडे जाणीव होतच नाही. हिंदूच्या रक्तात राष्ट्रीयत्वाच्या जाणीवा पेटत्या नसतात, असंही ते म्हणाले.